Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सबल मुलगी सुरक्षित मुलगी



सबल मुलगी- सुरक्षित मुलगी



                                                 



                                उपक्रमकर्ता –
                            श्री एस. बी. पाटील
    मुख्याध्यापक, मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज
                   ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर



मनोगत
                  मी गगनबावडा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, गगनबावडा ता. गगनबावडा जि. कोल्हापूर या संस्थेच्या मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज, ता. गगनबावडा जि. कोल्हापूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. गेली २६ वर्षे या शाळेत सेवेत आहे. विद्यार्थी व शाळेच्या प्रगतीसाठी या कालावधीत मी अनेक उपक्रम माझ्या सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांच्या सहकार्याने राबविले. ह्याचा परिणाम म्हणून समाजात शाळा नावारूपास आली आहे.
       सध्या समाजात मुलीवरील अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत यामुळे कोणाही संवेदनशील मनाच्या व्यक्तीला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील कोपर्डी जि. अहमदनगर येथील निर्भयाच्या अमानुष हत्येनंतर आपल्या शाळेतील मुलीना अशाप्रकारच्या कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यावे लागू नये यासाठी त्याना सक्षम बनविण्याची गरज माझ्या मनात अधोरेखीत झाली. आणि ह्यातूनच ह्या नवोपक्रमाचे बीज माझ्या मनात अंकूरले.
      आपल्या देशातील विशेषता ग्रामिण भागातील मुलीना किशोरवयीन मुलींच्या संदर्भात असलेल्या कायद्यांची माहिती नाही, सरकार मुलींसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती ग्रामिण भागातील मुलींपर्यंत पोचत नाही. मुलींच्या पालकांमध्येही खूपच अनास्था असल्याने त्यांचेही विशेषता मुलींच्या मातांचे प्रबोधन होणे गरजेचे वाटले. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला.
       ह्या नवोपक्रमाचा फायदा शाळेतील विद्यार्थिनिना झाल्याचे पूर्व व उत्तर चांचणी च्या विश्लेषणावरून दिसून येते. मुलींचा वाढलेला आत्मविश्वास हे  सुध्दा ह्या नवोपक्रमाचे फलित आहे. हा नवोपक्रम फक्त मुलींसाठीच फायदेशीर ठरला असे नसून पालकांना सुध्या ह्या नवोपक्रमाचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. सदर उपक्रमाचा ही लिखीत अहवाल आपल्या हाती देताना मला आज मनस्वी आनंद होत आहे.


                                                 
अनुक्रमणिका
.क्र.
तपशील
प्रास्ताविक
नवोपक्रमाची गरज
नवोपक्रमाची व्याप्ती व मर्यादा
नवोपक्रमाचा कालावधी
नवोपक्रमाचे वेगळेपण
नवोपक्रमाचे स्वरूप व खर्च
नवोपक्रमाची उद्दीष्टे
नवोपक्रमाची उपयुक्तता
नवोपक्रमाचे नियोजन
१०
आवश्यक साधने
११
नवोपक्रमाची कार्यवाही
१२
नवोपक्रम पूर्ण झाल्यानंतरची निरीक्षणे व त्याच्या नोंदी
१३
कार्यवाहीत आलेल्या अडचणी
१४
माहितीचे विश्लेषण
१५
नवोपक्रमाची यशस्विता
१६
समारोप
१७
संदर्भ









प्रास्ताविक

       माध्यमिक शिक्षण हा विद्यार्थिनिंच्या जिवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. याच काळात मुली वयात येतात. वयात येताना त्यांच्या शरिरात होणारे बदल त्याना गोंधळात टाकतात. अनेक गोष्टी अशा असतात की त्यासंदर्भात नेमके कोणाशी बोलावे त्याना सुचत नाही. जिज्ञासा तर मनात असते पण त्यांचे समाधान होत नाही.  सध्याच्या ह्या धावपळीच्या जगात मुलींच्या मनात डोकावण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. ग्रामिण भागातील पालकांची तर वेगळीच समस्या आहे. मुळात मुलीना त्यांच्या शंका विचारण्याची मोकळीक ग्रामिण भागातील वातावरणात मिळत नाही.  त्याचा परीणाम म्हणून मुलींचा मानसिक कोंडमारा होतो. त्यातूनच इतर अनेक गुंतागुंती निर्माण होतात, आज मुलीना अनेक मोह खुणावत असतात. शालेय जिवनात मुली ह्या मानसिक दृष्ट्या पोक्त नसतात. चांगल्या वाईटाची निवड करण्यात त्यांची चुक होवू शकते. ह्या सर्व बाबींचा विचार करून मानसिक रित्या मुली कणखर बनविणे व शारिरीक दृष्ट्याही त्याना कणखर बनविण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे आज गरजेचे आहे.
              आज शालेय जिवनात मुली फक्त पुस्तकी ज्ञान मिळविताना दिसतात, जिवनासाठी आवश्यक असणारे ज्ञान, कौशल्ये यामध्येही त्यानी पारंगत होणे गरजेचे आहे. आज आपण कितीही २१ व्या शतकाच्या गप्पा मारल्या तरीही आपल्या देशातील महिलेला चूल आणि मुल चुकलेले नाही. अगदी कितीही मोठ्या पदावर कार्यरत असणारी स्त्रिला सुध्दा आज स्वयंपाक घर अटळ आहे.  आणि  जे अटळ आहे त्याची तयारी शालेय जिवनात होणे गरजेचे आहे.  यासाठी पाककृती, आर्थिक साक्षरता, संरक्षण कला, सभाधिटपणा, महिला विषयक कायद्याची काळजी, आरोग्यविषयक शास्त्रिय माहिती या सर्व बाबींची मुलीना माहिती असणे ही काळाची गरज आहे.    
         शाळेत विविध उपक्रम राबविताना त्यामध्ये असणारा विद्यार्थिनिंचा नगण्य सहभाग, मुलींचा लाजरा स्वभाव, दुपारच्या वेळी दुकानातील जंक फूडचा अनावश्यक वापर ह्या सर्व बाबींवर मुलींचे प्रबोधन करणे गरजेचे वाटत होतेच. त्याचबरोबर आजूबाजूला घडणाऱ्या अनेक चिंतनिय घटनां सुध्दा ह्या नवोपक्रमाच्या कार्यवाहीसाठी कारणीभूत ठरल्या.  अर्थात ह्या एकाच नवोपक्रमामुळे जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे सर्वकाही चांगले होणार असा माझा दावा नाही, मात्र मुलींच्या एकूणच व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी हा नवोपक्रम निश्चितच पोषक ठरेल या आशावादाने मी हा नवोपक्रम सुरु केला.
              पालक हे  विद्यार्थ्यांचे पहिले शिक्षण असतात, तर शिक्षक हे दुसरे पालकच असतात ही उक्ती विचारात घेता, मुली सुरक्षित रहाण्यासाठी प्रयत्न करणे हे दुसरे पालक म्हणून शिक्षकांचे कर्तव्यच ठरते. या सर्व गोष्टींचा समग्र विचार करून मी शाळेत इयत्ता नववी व दहावी मधील मुलींसाठी सबल मुलगी सुरक्षित मुलगी हा नवोपक्रम राबविण्याचा निर्णय  घेतला आणि जानेवारी २०१६ पासून हा उपक्रम सुरु केला. ऑक्टोबर २०१६ मध्ये हा नवोपक्रम मी पूर्ण केला.

 . नवोपक्रमाची गरज –
           मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज ता. गगनबावडा जि. कोल्हापूर या शाळेत इयत्ता पाचवी पासून इयत्ता दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. इयत्ता पाचवी, इ. सहावी, इ. सातवी व काही प्रमाणात  इ. आठवी च्या वर्गातील मुली ह्या इ. नववी व इ. दहावीच्या वर्गातील मुलींपेक्षा अधिक बोलक्या , उत्साही, प्रसन्न व्यक्तीमत्वाच्या, जिज्ञासू, खेळकर असल्याचे जाणवले. ह्या स्थितीमागिल कारणे शोधताना मुली जसजशा वयात येतात तसतश्या त्या अबोल, काहींशा अलिप्त, निरूत्साही बनत जातात असे आढळून आले.
ह्या बाबतीत शाळेतील सर्व शिक्षकांशी चर्चा करताना व किशोरवयीन मुलींच्या समस्या संदर्भातील साहित्य वाचून पाहिले असता ह्या सर्व समस्यांच्या मुळाशी वयात येताना मुलींच्या शरिरात होणारी वाढ, भावनिक वाढ व त्यातून निर्माण होणाऱ्या शंका, प्रश्न असतात असे जाणवले.
वयात आलेल्या मुली ह्या कोषात असल्यासारख्या वागतात.  अनेकदा मुली शाळेतून दुपारीच घरी परत जातात, त्यांच्या खाण्यात जंक फूडचे प्रमाण अधिक असते. नाचण्याची भाकरी काळी म्हणून ती खाणे टाळणे,  वैयक्तीक आरोग्याची काळजी न घेणे, वैयक्तीक स्वच्छता न पाळणे अशा काही समस्या नवोपक्रमकर्त्यास जाणवल्या.
शाळेतील कार्यक्रमातून ह्या मुली अलिप्त असतात. कार्यक्रमास हजर रहातात मात्र त्यात स्वता सहभाग घेत नाहीत.  स्टेजवर येणे मत व्यक्त करणे अशा गोष्टी नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतात.
घरात आपल्यावर अतिरिक्त बंधने आहेत, मुलग्याच्या तुलनेत आपल्याला सापत्न वागणूक मिळते आणि हा आपल्यावर अन्याय आहे. याची जाणिव ही या मुलीना नाही. त्यामुळे त्याविरोधात कृती ही गोष्ट खूपच दूरची आहे.
किशोरवयीन मुलींच्या संदर्भात शासनाने केलेल्या कायद्यांची माहिती मुलीना नाही. Child Line 1098 याविषयी मुलीना कोणतीही माहिती नाही. बऱ्याच मुली आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी पालकांशी बोलत नाहीत. पालक सुध्दा कधी  जादाची विचारपूस करीत नाहीत. आई मुलीना सर्व गोष्टी समजावून सांगत नाही, किंवा सांगीतलेच तर त्यात शास्त्रिय माहितीची उणिव असते असे आढळले.
मुलीना संरक्षण कलेची माहिती नाही, त्यामुळे एखाद्या कठीण प्रसंगात इतर कोणी मदतीला नसेल तर स्वताच स्वताचे संरक्षण करणे त्याना शक्य होत नाही.
बँकेतील व्यवहार कसे चालतात याची त्याना माहिती नाही. चेकच प्रकार, डी. डी. म्हणजे काय याविषयी त्याना माहिती नाही.
बहुतांशी मुली घरी आईला स्वयंपाकात मदत करतात, पण उपलब्ध साहित्याचा वापर करून पोषक आहार कसा बनवायचा याचे ज्ञान मुलीना नाही.
आपल्या परीसरात उपलब्ध असणाऱ्या आणि मोफत मिळणाऱ्या पालेभाज्या आणि त्यांचे औषधी महत्व मुलीना माहिती नाही.
                 राजधानी दिल्ली मध्ये १६ डिसेंबर  २०१२  मध्ये झालेल्या अमानुष सामुहिक बलात्कारानंतर देशपातळीवर अशा घटनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर  शासनाने महिलावरील अत्याचारासंदर्भात कठोर कायदा केला.  महिलावरील बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यासाठी किमान २० वर्षाची शिक्षा देण्याची तरतूद २०१३ च्या कायद्यात करण्यात आली. आणि देशात हा कायदा एप्रिल २०१३ पासून लागू करण्यात आला.  याच बरोबर महिलावरील अत्याचाराचा गुन्हा नोंद करून घेण्यात हयगय करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास सुध्दा दंडाची व्यवस्था या कायद्यान्वये करण्यात आली आहे.
            खरंतर महिलावर अत्याचार करणाऱ्याना कायद्याची भिती अजिबात नाही. आणि यामुळेच महिला व मुलींवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  या मुली स्वताच स्वताचे रक्षण करू शकत नाहीत,  अत्याचाराचा प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण जर सर्वच मुलीना मिळाले, जर सर्वच मुली  इतर कोणाच्याही मदती खेरीज अशा घटना होवूच नयेत म्हणून स्वता दक्ष राहिल्या तर निश्चितच काही प्रमाणात बलात्काराच्या घटना कमी होतील.
     आज देशातील कोणत्याही मुलीच्या बाबतीत अनिष्ट गोष्ट घडू शकते असे म्हंटल्यास वावगे ठरू शकणार नाही. समाजातील काही वाईट प्रवृत्तीचे लोक जरी यासाठी जबाबदार असले तरीही जोपर्यंत मुलगी स्वताचे रक्षण स्वता करू शकणार नाही तोपर्यंत कितीही कायदे सरकारने केले तरीही मुलींवरील अत्याचार कमी होवू शकत नाहीत. हा विचार करून मुलीना सबल करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून हा  नवोपक्रम सुरु करण्याचे माझ्या मनात आले.

   . नवोपक्रमाची व्याप्ती व मर्यादा.
       माझ्या नवोपक्रमाची व्याप्ती व मर्यादा खालीलप्रमाणे
१.      प्रस्तुत नवोपक्रम हा मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज ता. गगनबावडा जि. कोल्हापूर या शाळेपुरता मर्यादित आहे.
२.     सदरचा नवोपक्रम हा मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज ता. गगनबावडा जि. कोल्हापूर या शाळेतील इ. ९ वी मधील २६ विद्यार्थिनी  व इ. १० वी मधील ३३ विद्यार्थिनीं यांच्यापुरता मर्यादित आहे.
३.     या नवोपक्रमात इ. ९वी व इ. १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी त्यांचे पालक व विद्यालयातील सर्व शिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.




. नवोपक्रमाचा कालावधी-
           सबल मुलगी सुरक्षित मुलगी ह्या नवोपक्रमाची सुरुवात १ जानेवारी २०१६ मध्ये करण्यात आली. १ जानेवारी रोजी विद्यालयात आयोजित मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुर करण्यात आला. या नवोपक्रमांतर्गत विविध व्याख्याने, प्रात्यक्षिके, जनजागरण, मेळावे, कार्यशाळा अशा  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. २५ ऑक्टोबर २०१६ मध्ये ह्या नवोपक्रमाची सांगता करण्यात आली. एकूण सुमारे दहा महिण्याचा हा कालावधी आहे.
















५. नवोपक्रमाचे वेगळेपण
                 लहान मुले ही समाजाचा दुर्बल घटक मानली जातात, कारण ती आपल्या  पालन-पोषणासाठी मोठ्यांवर अवलंबून असतात. परंतु दुर्दैवाने ह्या दुर्बल घटकाचे शोषण सर्वाधिक रीत्या समाजात दिसून येते.हिंसाचार, शिव्या, मारामाऱ्या , आतंकवाद ह्यांना सध्याची लहान मुलांची पिढी प्रत्यक्ष व प्रसारमाध्यमांतून रोजच सामोरी जात असते. पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांना चोपणे,  स्त्रीभ्रूणहत्या, मुलीला जन्मानंतर नष्ट करणे, जातिभेद किंवा धर्मामुळे पोळली जाणारी मुले,  मुलींची कुटुंबात व समाजात होणारी अवहेलना,  बालविवाह, बलात्कार, छळ अशा अनेक परिस्थितींचा, वस्तुस्थितींचा सामना आजच्या मुलामुलींना करायला लागतो. आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत मुलांपेक्षा मुलीना तर अधिकच त्रासाला सामोरे जावे लागते.  अगदी चांगल्या शिक्षित कुटुंबात सुध्दा मुलींवर शारिरीक, मानसिक, भावनिक अत्याचार होत नसतील असे आज छातीठोक पणे कोणीही सांगू शकत नाही. कदाचित अशा गोष्टी मागे पालकांच्या मनात आपल्या मुलींबद्दल असणारी अतिरिक्त काळजी सुध्दा असू शकेल, पण यामुळे आज मुलांच्या तुलनेत मुलीना अधिकच जाचक अटीना सामोरे जावे लागते आहे.
              या सर्व पार्श्वभूमिवर मुलीना त्यांच्यावरील अन्यायाची जाणिव करून देणे, आणि मुलांप्रमाणेच मुलीना सुध्दा घरातूनच समान वागणूक मिळावी या साठी प्रयत्न करणे. आज मुलगी नको म्हणण्यामागे समाजाची मानसिकता ही मुलगी हे परक्या धन हे  नसून , मुलगी म्हणजे आयुष्यभरची चिंता हे आहे. कारण आज मुलीवर जे अत्याचार होत आहेत ते पाहून कोणीही पालक मुलींबाबत निश्चिंत राहू शकत नाही.  मुलींवरील अत्याचार हा खूपच चिंतेचा विषय आहे.  ज्या मुलीवर अत्याचार होतो त्या अत्याचार ग्रस्त मुलीचे संपूर्ण कुटुंब स्वतःला दोषी समजू लागते, त्यानी कोणताही गुन्हा केलेला नसतानासुध्दा समाजात उजळ माथ्याने ते वावरू शकत नाहीत. ते जिथे जातील तिथे त्यांचीच चर्चा होत असते. आज माध्यमाच्या द्वारे कोणतीही गोष्ट तात्काळ सार्वजनिक चर्चेचा विषय होते.  आणि मुलीं किंवा महिलांवरील अत्याचार या बाबतीत तरी सर्व माध्यमे एका मर्यादेच्या पुढे जावून स्वतःच्या विचार स्वातंत्र्याचा हक्क बजावताना दिसतात. या पार्श्वभूमिवर मुलगी नकोच अशी जर जन्मदात्यांची भूमिक तयार झाली तर यात नवल ते काय.
                  वरील सर्व गोष्टींचा विचार करता  मुलींची सुरक्षितता ही आज सर्वात महत्वाची वाटते. समाजातील स्त्री भ्रुण हत्या टाळण्यासाठी मुलींच्यावर होणारे अत्याचार पूर्णता थांबणे गरजेचे वाटते. आणि कोणत्याही कायद्याने ही गोष्ट होणार नाही त्यासाठी स्वता समाजाने पोलिस बनणे, स्वतः मुलीनी सक्षम बनणे मला गरजेचे वाटते.
                      मुलीनी फक्त सक्षम बनावे अशी अपेक्षा करून कोणतीही मुलगी सक्षम बनणार नाही, त्यासाठी तशी सोय निर्माण होणे गरजेचे आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मुली सुशिक्षित होतात, पण एकूणच त्या सक्षम होतात असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. यासाठी एखादा वेगळा उपक्रम सुरु करण्याचे मनात होतेच. ०१ जानेवारी २०१६ रोजी माता पालक मेळाव्यामध्ये हा विषय सर्व उपस्थित मातांच्या पुढे मांडला आणि उपस्थित मातांशी चर्चा करूनच ह्या उपक्रमाची सुरुवात केली.
                    सबल मुलगी म्हणजे फक्त शारिरिक दृष्ट्या सबल नव्हे तर मानसिक दृष्ट्याही ती सबल असावी, समाजातील कोणत्याही भूलभूलैयाला ती फसणार नाही यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
                   मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी, नाही म्हणण्याची कला, पाककलेतील पारंगतता, पाहूणचार कसा करावा, आर्थिक साक्षरता, वैयक्तिक आरोग्य, सकस आहाराचे महत्व, संरक्षण कलेतील पारंगतता असे विविध विषय या नवोपक्रमांतर्गत हाताळण्यात आले. मुलींचा सर्वांगिण विकास कसा होऊ शकेल या संदर्भात अनेक व्यक्तींशी चर्चा करून नवोपक्रमाची कार्यवाही करण्यात आली. वर उल्लेख केलेले सर्व विषय हे मुलींच्या जिवनाशी अत्यंत निगडीत तर आहेतच शिवाय ते निकडीचे सुध्दा आहेत तथापि शालेय अभ्यासक्रमा पासून दूर आहेत.
                    वरील सर्व मुद्यांचा विचार करता सबल मुलगी – सुरक्षित मुलगी हा सर्वस्वी वेगळेपण असणारा व एक महत्वाचा नवोपक्रम आहे.

              
          
  



 ६. नवोपक्रमाचे स्वरूप
          सबल मुलगी सुरक्षित मुलगी हा नवोपक्रम प्रामुख्याने मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असळज या विद्यालयातील  इयत्ता नववी व इयत्ता दहावी मधिल मुलींशी आणि त्यांच्या पालकांशी निगडीत आहे. त्यामुळे नवोपक्रमांतर्गत नियोजित सर्व व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण व अनुषंगीक कार्यक्रम हे मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज येथे व ज्या वाडी वस्तीमधून मुली शाळेस येतात अशा वाडी वस्तीवर प्रामुख्याने घेण्यात येणार आहेत.
                     हा नवोपक्रम किशोरवयीन मुलींसाठी व त्यांच्या पालकांसाठी असेल. मुलींच्या विविध समस्यांचा शोध घेणे, त्यासाठी निरीक्षण, प्रश्नावली,  पालकांशी चर्चा, शिक्षकांशी चर्चा, समस्या शोध पेटी इत्यादीं माध्यमांचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले.
     













 ६.१ नवोपक्रमासाठीचा खर्च ­­- 
            ०१ जानेवारी २०१६ रोजी उपक्रमास सुरुवात केली. सुमारे दहा महिण्याचा कालावधी ह्या नवोपक्रमास निश्चित करण्यात आला. उपक्रम पूर्ण करण्यासाठी व्याख्यात्यांचे मानधन, कराटे प्रशिक्षिकेचे मानधन, पाककलेसाठीचा साधनांचा खर्च, विविध स्पर्धा, माता पालक मेळावा, वाडी वस्तीवरील मेळावे येथील  पालकांचा चहापान खर्च   असा खर्च अपेक्षित होता. तथापि व्यावसायिक व्याख्यातांचा वापर न करता शासकिय अधिकारी वर्गाचाच मोठ्या प्रमाणात उपयोग केल्यामुळे मानधन देण्याचा खर्च वाचवण्यात मदत झाली. कराटे प्रशिक्षिका सौ. कुलकर्णी यांच्या मानधनाचा भार जिल्हा परीषद सदस्या सौ. प्रिया प्रकाश वरेकर यानी हलका केला. जिल्हा परीषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सहकार्याने शासकिय योजनेचा भाग म्हणून मुलींना तब्बल एक महिण्याचे प्रशिक्षण देता आले.
              वाडी वस्तीवरील पालक मेळाव्यांचा खर्च स्थानिक पालकानी व तेथील माजी विद्यार्थानी केला. मेळाव्याच्या ठिकाणी ध्वनिवर्धक, बैठक व्यवस्था व चहापान यासाठी कोणत्याही ठिकाणी  नवोपक्रमकर्त्यास खर्च करावा लागला नाही.
            वैयक्तीक स्वच्छतेचा भाग म्हणून मुलीना सॅनिटरी पॅड पुरविण्याची जबाबदारी स्थानिक आरोग्यसेविकेने घेतली.  आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम सुध्दा  स्वता नवोपक्रमकर्त्यास पैसा न खर्च करता पार पाडता आला.
       









 ६.२ नवोपक्रमाचे अपेक्षित फायदे –
            ह्या नवोपक्रमाचा उपयोग मुलींच्या दैनंदिन जिवनात होणार आहे. ग्रामिण भागातील शाळेत शिकणाऱ्या मुलीना त्यांच्या वैयक्तीक आरोग्याविषयी शास्त्रिय माहिती मिळाल्यास निश्चितच त्यांच्या भविष्यातील अनेक आरोग्य समस्येपासून त्या दूर रहातील. पालकांच्या प्रबोधनामुळे घरी होणारा मुलगा मुलगी असा भेदभाव दूर होईल, मुली सुध्या मुलांप्रमाणेच सर्व गोष्टींच्या हक्कदार आहेत याची जाणिव पालकाना होईल. अनेकदा मुली दुपारच्या वेळी शाळेतून आरोग्याची तक्रार सांगून घरी जातात, या उपक्रमामुळे त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीच दूर होवून दूपारी घरी जाण्याचे प्रमाण खूपच कमी होवू शकेल.  त्यामुळे मुलींचा शैक्षणिक विकास होईल.
             मुलींच्या मनात असलेला न्युनगंड दूर होण्यास या नवोपक्रमामुळे मदत होईल. आणि शालेय आणि सहशालेय कार्यक्रमात त्या मोठ्या हिरीरिने सहभागी होतील. एकंदरीत मुलींच्या एकूणच व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल होईल अशा स्वरूपाचा  हा नवोपक्रम आहे. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागरण व पालक मेळाव्यातून मुलगी म्हणजे चिंतेचा विषय नाही याची जाणिव पालकाना करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.  स्त्री भ्रूण हत्याच्या प्रकारात घट होण्याससुद्धा या नवोपक्रमाचे सहकार्य होईल.  वैयक्तीक आरोग्य  व स्वताच्या काही समस्यावर विद्यार्थिनी आपल्या पालकांशी किंवा समवयस्क मैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा मारू शकतील. मुलींच्या मनातून मासीक पाळीविषयी असणारी अकारण भिती नाहीशी होईल. दूपारच्या वेळेत घरी जाणाऱ्या मुलींच्या प्रमाणात घट होवू शकेल.










 . नवोपक्रमाची उद्दिष्टे
१. किशोरवयीन मुलींच्या समस्यांचा शोध घेणे.
२. घरी व परीसरातील उपलब्ध पौष्टीक आहाराची ओळख करून देणे.
३. जिवनातील धोक्यांची जाणिव करून देवून त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी विद्यार्थिनिना संरक्षण कलेचे ज्ञान देणे.
४. मुलीना व्यक्त होण्यासाठी प्रेरीत करणे.
. मोबाईल, टि. व्ही. इंटरनेट या माध्यमांचा सुरक्षित वापर करण्यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणे.
. मुलींसंदर्भातील विविध कायद्यांची विद्यार्थिनीना जाणिव करून देणे.
. मुलींना समजून घेणेसाठी पालकांना प्ररीत करणे.






    




    

. नवोपक्रमाची उपयुक्तता-
   सबल मुलगी सुरक्षित मुलगी हा नवोपक्रम खालील दृष्टीने फायदेशी आहे.
१.                या नवोपक्रमाद्वारे मुलीना विविध व्याख्यानाद्वारे उदबोधित करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मुलींच्या एकूणच आत्मविश्वासात वाढ झाल्याचे दिसून येईल.
२.               या नवोपक्रमाद्वारे मुलींना पाककलेत पारंगत करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामुळे मातापालकांतून सुध्दा एकूणच शिक्षण पध्दतीविषयी आस्था निर्माण होण्यात वाढ होईल.
३.                या नवोपक्रमामुळे मुलीना कायद्याची जाणिव व्याख्यानाद्वारे केल्याने त्यांच्या वागण्यात आपण सुरक्षित असल्याची जाणिव निर्माण होईल.
४.              या नवोपक्रमामुळे पालकांत विशेषता माता पालकांत आपल्या मुलीं विषयी असलेली अनावश्यक काळजी दूर होण्यास मदत होईल.
५.               या नवोपक्रमामुळे मुलीसमोर असलेल्या अनेक आरोग्य विषयक समस्या महिला डॉक्टरानी केलेल्या मार्गदर्शनामुळे दूर होण्यास मदत होईल.
६.              या नवोपक्रमामुळे केलेल्या जनजागरणाचा फायदा समाजात लिंगसमभाव विषयक दृष्टिकोन निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो.
७.              एकूणच या उपक्रमामुळे पालक- शिक्षक यामध्ये प्रभावी समन्वय घडून येतो व परस्परांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होतो, आपली मुलगी सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री पटते.








. नवोपक्रमाचे नियोजन
     ९.१  नवोपक्रमाचे प्रारूप निश्चिती.
                या नवोपक्रमाचे प्रारूप निश्चितीकरिता जिल्ह्यातील काही उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी प्रत्यक्ष समोरासमोर अथवा फोनद्वारे चर्चा करण्याचे ठरले.
     ९.२  शिक्षक सभा.
               या नवोपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांची नेमकी भूमिका काय, विद्यार्थिनींच्या व्यक्तीमत्व विकासात शिक्षक कशा प्रकारे सहाय्यभूत ठरू शकतात यासंदर्भात मुख्याध्यापकानी स्वता शिक्षकाना मार्गदर्शन करण्याचे निश्चित केले. तसेच प्रत्येक शिक्षकांकडे नेमकी कोणता उपक्रम देता येईल हे निश्चित केले.
   ९.३  पहिली माता पालक सभा.
             पहिल्या माता पालक सभेत मुलीना मातानी नेमके कसे समजून घ्यावे, मुलींच्या समस्या कशा हाताळाव्यात, व्यक्तीमत्व विकासात मातांचे योगदान नेमके काय असू शकते या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्याचे ठरले. एकूणच नवोपक्रमात माता पालकांकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्द मुख्याध्यापकानी माता पालकाना मार्गदर्शन करावे असे ठरले.
       त्याच प्रमाणे माता पालकाना विश्वासात घेवून संपूर्ण नवोपक्रमाची हाताळणी करावी व त्यांच्या पूर्व संमंत्तीनेच विविध उपक्रमाना अंतिम रूप द्यावे असेही ठरले.
  ९.४   विविध व्याख्यानांचे आयोजन. 
आर्थिक साक्षरता, व्यक्तीमत्त्व विकास, महिलांविषयक कायदे, नाही म्हणण्याची कला यांसंदर्भात त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने आयोजित करावेत व मुलींचे प्रबोधन करावे असेही ठरले.


९.५   विविध कार्यशाळांचे आयोजन.
         स्व संरक्षण कला, पाककला, रांगोळी रेखाटने, पाहूणचार, वैयक्तीक आरोग्य या संदर्भात विविध कार्यशाळांचे आयोजन करावे असे ठरले.
    ९.६  मुलींच्या समस्या शोधण्यासाठी समस्याशोध पेटी.
    मुलींसमोर असलेल्या सामुहिक अथवा वैयक्तीक समस्या शोधण्यासाठी शाळेत मुलीना उद्युक्त करावे व त्यासाठी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी समस्याशोध पेटी ठेवण्याचे ठरले.
      ९.७  मुलीना वैयक्तीक मार्गदर्शन.
       मुलींच्या वैयक्तीक समस्या समोर आल्यातर त्यांचे योग्य आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकडून समूपदेशन करण्याचे ठरले.
        ९.८ शिक्षक आपल्या भेटीला, या अंतर्गत शिक्षक व मुख्याध्यापकांची वस्तीभेट व मार्गदर्शन.
    ग्रामिण भागातील पालक हे रोजीरोटी साठी कामधंद्यात व्यस्त असतात. त्याना शाळेत येवून आपल्या मुलींच्या प्रगतीसंदर्भात नियमितपणे चौकशी करणे शक्य होत नाही. यासाठी वाडी वस्तीवर जावून तिथे पालकांची भेट घेण्यासाठी व उपक्रमाची माहिती देण्यासाठी वस्तीभेटी घेण्याचे ठरले.








आवश्यक साधने
       
      १०.१  उपक्रमाचे वेळापत्रक .
           इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या मुलींसाठी राबवायच्या विविध उपक्रमांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यामध्ये आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक साक्षरता, वैयक्तीक स्वच्छता, महिंलाविषयक कायदे यांची माहिती व्हावी या उद्देशाने विविध व्याख्यानांचे नियोजन शिक्षक व माता पालक सभेत मांडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात  आले. सदरच्या नियोजनाची माहिती सभेतच सर्व माता पालकाना व शिक्षकाना देण्यात आली. या नियोजनाप्रमाणे सर्व बाबी पार पडतात का ते पहावे यासाठी पालकानी जागृत रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. जूलै-, ऑगस्ट –सप्टेंबर-, ऑक्टोबर-
महिना
कार्यक्रम तपशील
जानेवारी २०१६
       i.             माता पालक मेळावा, 
     ii.             शिक्षक चर्चा,
  iii.             तज्ञांशी चर्चा,
फेब्रुवारी २०१६
        i.            जनजागरण फेरी,
     ii.             वैयक्तीक आरोग्य,
  iii.             आर्थीक साक्षरता व्याख्यान,
मार्च २०१६
i     संरक्षण कला- ज्युदो कराटे प्रशिक्षण
एप्रिल २०१६
i     वाडी वस्तीवरील पालक भेटी
जुन २०१६
i     योगाभ्यास,
ii       मोबाईल टिव्ही चा जपून वापर.
जूलै २०१६
i     चित्रफितींच्या माध्यमातून प्रबोधन
ऑगस्ट २०१६
          i.          भाजी भाकरी पार्टी,
        ii.          सकस आहार पाककृती कार्यशाळा.
सप्टेंबर २०१६
          i.          वैयक्तीक आरोग्य व्याख्यान,
        ii.          पाहूणचार कसा करावा मार्गदर्शन
ऑक्टोबर २०१६
          i.          वाडी वस्तीवरील पालक भेटी,


१०.२  मुलींच्या संदर्भातील चित्रफित.
       मुलींना काही विषय चांगले समजावेत यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून काही          चित्रफिती संकलित करण्यात आल्या. या चित्रफितींच्या माध्यमातून child line  विषयक       माहिती,  शरिर रचना, मासिक पाळी यासंदर्भात माहिती देण्याचे निश्चित करण्यात आले.
१०.३  पूर्व चाचणी
 मुलींच्या समस्या शोधण्यासाठी इयत्ता नववी व दहावीतील मुलींची एक पूर्व चांचणी घेण्यात आली. यासाठी होय किंवा नाही  यासंदर्भातच नेमकेपणे उत्तर देतायेईल अशी प्रश्नावली तयार करून विद्यार्थिनिना देण्यात आली.
१०.४  विकासपेडिया वेबसाईट.
 मुलींना कायद्याविषयक नेमकी माहिती असावी, वयात येताना शरिरात होणाऱ्या नेमक्या बदलांची माहिती व्हावी यासाठी शासनाच्या माहिती पोर्टलचा अर्थात www.vikaspedi.in या वेबसाईटची आधार घेण्यात आल. त्यावरील माहिती ही अधिकृत व्यक्तीनी दिलेली असल्यामुळे माहितीची विश्वासार्हता आहे. यासाठी शाळेतील आय. सी. टी. प्रयोगशाळा वापरण्यात आली.

 
 











११. नवोपक्रमाची कार्यवाही-

  ११.१ पूर्वस्थितीची निरिक्षणे व त्याच्या नोंदी –
            हा नवोपक्रम ०१ जानेवारी २०१६ मध्ये सुरु करण्यात आला.  १ जानेवारी रोजी विद्यालयात माता पालक मेळावा घेण्यात आला. त्या मेळाव्यातच ह्या उपक्रमाची मुहूर्त मेढ रोवण्यात आली. गतवर्षी इ. ८ वी व इ. ९ वी मध्ये असणाऱ्या मुलींचा समावेश ह्या नवोपक्रमात करण्यात आला. ह्याच मुली आता विद्यालयात  अनुक्रमे इ. ९ वी व इ. १० वीच्य वर्गात शिकत आहेत. या विद्यार्थिनी मधिल समस्यांचा शोध घेण्यासाठी व नवोपक्रमाच्या पूर्वस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक पूर्व चाचणी घेण्यात आली. ह्या चाचणीतील प्रश्न   व त्याना मिळालेला प्रतिसाद व विश्लेषण पुढील प्रमाणे.
पूर्व चांचणी चा प्रतिसाद, विश्लेषण व निष्कर्ष
             प्रश्नावली द्वारे घेतलेल्या पूर्व चांचणीस इयत्ता नववीतील २६ व इयत्ता दहावीतील ३३ विद्यार्थिनिनी दिलेला प्रतिसाद, विश्लेषण व निष्कर्ष पुढील प्रमाणे.
प्र १ ला.  वयात येताना शरिरात होणाऱ्या वाढीसंदर्भात नेमकी शास्त्रिय माहिती तुला आहे काय?
प्रतिसाद - या संदर्भात एकूण ५९ मुलींपैकी ९  मुलींनी माहिती आहे असा प्रतिसाद दिला. तर ३४ मुलीना जूजबी माहिती आहे व उर्वरीत १६ मुलीनी माहिती नाही असा प्रतिसाद दिला.
विश्लेषणः   केवळ १५ टक्के मुलीना वयात येताना शरिरात होणाऱ्या वाढीसंदर्भात माहिती आहे. उर्वरीत ८५ टक्के मुलीना जुजबी माहिती आहे किंवा अजिबात माहिती नाही.
निष्कर्षः – वयात येताना शरिरात होणाऱ्या वाढीसंदर्भात मुलीना शास्त्रिय माहिती देण्याची आवश्यकता आहे.

प्र. २ रा   -आढळणाऱ्या पालेभाज्या आवडीने खाता काय?
प्रतिसाद - या प्रश्नाला प्रतिसाद देताना १४ मुलीनी पालेभाज्या आवडतात,  २५ मुलीना आवडत नाहीत पण तरीही त्या क्वचित भाजी खातात तर उर्वरीत २० मुली परीसरात आढळणाऱ्या पालेभाज्या खात नाहीत असे उत्तर दिले.
विश्लेषणः  परीसरात आढळणाऱ्या पालेभाज्या केवळ २४ टक्के मुली आवडीने खातात उर्वरीत ७६ टक्के मुलीना या पालेभाज्या खाण्याची आवड नाही असे आढळते.
निष्कर्षः – परीसरात आढळणाऱ्या पालेभाज्या ह्या पोषणमुल्यानी भरपूर असतात, त्या खाण्याची आवड मुलींमध्ये निर्माण करण्याची गरज आहे.

प्र ३ रा  दुपारच्या सुट्टीत दुकानातील खाऊ खाता काय?
 प्रतिसाद - दुपारच्या सुट्टीत अजिबात खाऊ न खाणारी फक्त  १ मुलगी आढळली उर्वरीत मुलींपैकी ४४ मुली नियमितपणे तर १५ मुली कधीतरी दुकानातील खाऊ खातात.
विश्लेषणः दुकानातील खाऊ कधीही न खाणाऱ्या मुलींचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ९८ टक्क्यांपेक्षा अधिक मुली नियमितपणे किंवा कधी कधी हा खाऊ आवडीने खातात.
निष्कर्षः – दुकानातील जंक फूड खाण्याचे प्रमाण मुलींत अधिक आहे. यासाठी त्यांच्या दुष्परीणामांची जाणिव मुलीना करून देणे गरजेचे आहे.

प्र ४ था  - नाचण्याची भाकरी आवडते काय?
प्रतिसाद - नाचण्याची भाकरी खायला आवडते असा प्रतिसाद दिलेल्या मुलींची संख्या केवळ १४ आहे, ३८ मुली आवडत नाही तरीही क्वचित नाचण्याची भाकरी खातात, तर ७ मुलीना नाचण्याची भाकरी खाणे अजिबात आवडत नाही असे आढळते.
विश्लेषणः नाचण्याची भाकरी खायला आवडते म्हणणाऱ्या मुलींची संख्या केवळ २४ टक्के आहे. उर्वरीत ७६ टक्के मुलीना नाचण्याची भाकरी खायला आवडत नाही.
निष्कर्षः – नाचण्याची भाकरी ही पोषणमुल्यानी भरपूर आहे. सदृढ शरिरासाठी जेवणात नाचण्याची भाकरी नियमितपणे खाण्याची सवय लावणे गरजेचे आहे.

प्र ५ वा - शाळेतील कार्यक्रमात सहभाग घेतेस काय?
प्रतिसाद -  शाळेतील सहशालेय कार्यक्रमात फक्त १६ मुली आवडीने भाग घेतात. १३ मुली क्वचित सहभागी होतात तर ३० मुली ह्या कधीही सहभागी होत नाहीत.
विश्लेषणः जवळपास ५१ टक्के म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक मुली सहशालेय कार्यक्रमात भाग घेत नाहीत. नियमित पणे सहभागी होणाऱ्या मुलींचे प्रमाण २२ टक्के आहे .     
निष्कर्षः – मुलांचे व्यक्त होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यानी व्यक्त होणे गरजेचे आहे.
     
प्र ६ वा – घरात मुलांसारखीच वागणूक तुला मिळते काय?
 प्रतिसाद - १९ मुलीनी घरी समान वागणूक मिळते असा प्रतिसाद नोंदविला,  क्वचित प्रसंगी समान वागणूक मिळते असा प्रतिसाद १३ मुलीनी नोंदविला, तर २७ मुलीनी समान वागणूक मिळत नाही असा प्रतिसाद नोंदविला. 
विश्लेषणः मुलां मुलींना घरी समान वागणूक मिळते असा प्रतिसाद ३२ टक्के मुलीनी दिला. ४६ टक्के मुलीनी समान वागणूक मिळत नाही असा प्रतिसाद दिला.
निष्कर्षः – घरी मुलांसारखीच मुलीनासुध्दा वागणूक मिळण्यासाठी पालक प्रबोधन गरजेचे आहे.
          
प्र ७ वा – किशोरवयीन मुलींच्या शोषणाच्य विरोधात शासनाने केलेल्या कायद्याची तुला माहिती आहे काय?
प्रतिसाद - किशोरवयीन मुलींच्या शोषणासंदर्भात असलेल्या कायद्याची माहिती आहे असा प्रतिसाद एकाही मुलीने नोंदवला नाही.            
विश्लेषणः सर्व म्हणजे १०० टक्के मुलीना कायद्याच्या संरक्षणाविषयी काही माहिती नाही.
निष्कर्षः – मुलीना किशोरवयीन मुलींसंदर्भात असलेल्या कायद्यांची माहिती देणे गरजेचे आहे.

प्र. ८  वा - Child Line 1098  विषयी काही माहिती आहे काय?
 प्रतिसाद - चाईल्ड लाईन १०९८ विषयी एकाही मुलीला माहिती नाही असे आढळले.
विश्लेषणः चाईल्ड लाईन विषयी सर्व म्हणजे १०० टक्के मुली ह्या अनभिज्ञ आहेत.
निष्कर्षः – चाईल्ड लाईन १०९८ विषयी मुलीना माहिती देणे गरजेचे आहे.
प्र ९ वा – तुला संपूर्ण स्वयंपाक चांगल्या प्रकारे करता येतो काय?
प्रतिसाद - स्वयंपाक थोडा जमणाऱ्या मुलींची संख्या अधिक म्हणजे ४४ आहे. पूर्ण स्वयंपाक करू शकणाऱ्या मुलींची संख्या १५ आहे.
विश्लेषणः संपूर्ण स्वयंपाक करू शकणाऱ्या मुलींची संख्या ही २५ टक्के आहे. तर थोडा थोडा स्वयंपाक करणाऱ्या मुलींची संख्या ७५ टक्के इतकी मोठी आहे.
निष्कर्षः –स्वयंपाक कलेत पारंगत बनविण्यासाठी मुलीना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

प्र १० वा – तुला स्वताचे संरक्षण करण्याची कला अवगत आहे काय?
प्रतिसाद - स्वतःचे संरक्षण करता येते असा प्रतिसाद देणाऱ्या मुलींची संख्या १३ आहे, संरक्षणाची कला अवगत नाही असा प्रतिसाद ३६ मुलीनी नोंदवला तर जुजबी कला अवगत असल्याचा प्रतिसाद १० मुलीनी नोंदवला.
विश्लेषणः स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम आहे असा प्रतिसाद २२ टक्के मुलीनी दिला, तर ६१ टक्के मुलीना ही कला अजिबात अवगत नाही. १७ टक्के मुलीना ही कला थोडीफार अवगत असल्याचे दिसते.
निष्कर्षः – संरक्षण कलेत तरबेज होण्यासाठी मुलीना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

 प्र ११ वा – तुला बँकेचे व्यवहार कसे चालतात याविषयी काही माहिती आहे काय?
प्रतिसाद - बँकेचे व्यवहार कसे चालतात याविषयी ९ मुलीना जूजबी माहिती आहे, तर उर्वरीत ५० मुलीना याविषयी माहिती नाही असे आढळले.
विश्लेषणः केवळ १५ टक्के मुलीना बँकेच्या व्यवहारासंदर्भात जुजबी माहिती आहे. उर्वरीत ८५ टक्के मुलीना बँकेतील व्यवहारासंदर्भात माहिती नसल्याचे दिसते.
निष्कर्षः – बँकेच्या व्यवहारांची माहिती मुलीना देणे आवश्यक आहे.



११.२  केलेल्या कृती.
         या नवोपक्रमांतर्गत आयोजित केलेली कृती खालील प्रमाणे आहे.
    अ.  माता पालक सभा.
       या सभेत विद्यार्थिनिंच्या माताना बोलविण्यात आले. माजी सभापती सौ. वसुंधरा मानसिंगराव पाटील,  डॉ. महंमद शेख, विद्यामंदिर, असळज च्या मुख्याध्यापिका रंजना गुरव यांच्या उपस्थितीत हा माता पालक मेळावा पार पडला.  मुली आणि आई यामध्ये मैत्रीचे नाते कसे निर्माण करता येईल, मुलींच्या वैयक्तीक समस्या कशा हाताळता येतील अशा विषयावर माता पालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुलींची आरोग्यविषयक काळजी, त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला खतपाणी घालण्यासाठी नेमके काय करावे यासंदर्भात माता पालकाना उपस्थित मान्यवरांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
        घरातील वातावरण कसे मैत्रीपूर्ण ठेवता येईल, जेणेकरून मुलीना घरी कोणाशीही स्पष्ट बोलता येईल, मुलिना घरी आपल्या समस्या निसंकोचपणे सांगता याव्यात यासाठी परस्परांत विश्वास निर्माण करणे कसे गरजेचे आहे. यासंदर्भातही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले,  या सभेच्या माध्यमातून माता ना विश्वासात घेवून या नवोपक्रमांतर्गत जे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, त्यांच्या मुलींना निश्चितच फायदा होईल याची खात्री माता पालकांच्या मनात निर्माण करता आली. मुख्याध्यापिका सौ. रंजना गुरव ह्यानी मुलींच्या व्यक्तीमत्त्व विकासात आईची भूमिका या विषयावर यावेळी खुलासेवार मार्गदर्शन केले. माजी सभापती सौ. वसुंधरा मा. पाटील ह्यानी समाजात वावरताना मुलीनी कोणती काळजी घ्यावी ह्याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ शेख यानी वैयक्तीक आरोग्याची कशी काळजी घ्यावी ह्या संदर्भात विवेचन केले. माता पालकांच्या वतीने काही मातानीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
     विद्यार्थिनींचा आहार, त्यांचे टि.व्ही. अथवा मोबाईल वापरावरील मर्यादा, मुलींचा मित्र गट आणि आपल्या मुलावरही तो बाहेर कोणा मुलींची छेड काढत नाहीना याची खबरदारी घेण्यासंदर्भात  लक्ष ठेवण्यासाठी माताना मार्गदर्शन करणे.
         आपल्या परीसरात उपलब्ध असलेल्या धान्य, भाजीपाला यांचे महत्व स्पष्ट करण्यासाठी व त्यांचे आहारातील प्रमाण वाढावे व नियमित रहावे या दृष्टीने डॉ शेख यानी मार्गदर्शन केले. असळज येथील लोकनेते उदयसिंह उर्फ बाळ पाटील सभागृहात हा मेळावा संपन्न झाला.

 आ. संरक्षणासाठी ज्युदो- कराटे प्रशिक्षण.
            समाजात सध्या मुली किती सुरक्षित हा सध्या ऐरणीवरील प्रश्न आहे. या निमित्ताने माता पालकांशी केलेल्या चर्चेत ठरल्यानुसार मुलींच्या ज्युदो कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण वर्गाची सुरुवात जिल्हा परीषद सदस्या सौ. प्रिया प्रकाश वरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रशिक्षिका सौ कुलकर्णी, विद्या मंदिर असळज च्या मुख्याध्यापिक सौ. रंजना गुरव, श्री विठ्ठल इंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
      जिल्हा परीषद सदस्या सौ. प्रिया प्रकाश वरेकर यानी विद्यालयाच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. प्रशिक्षिका सौ. कुलकर्णी ह्या कराटेच्या ब्लॅक बेल्ट धारक असल्याने त्यानी मुलीना विशेष परीश्रम घेवून प्रशिक्षित केले. एकूण तीस दिवसाचे हे प्रशिक्षण रोज एक घड्याळी तास या प्रमाणे सुरु राहिले. ह्या प्रशिक्षणाचा उपयोग मुलीना स्वयं रक्षणासाठी निश्चितच होईल असा आशावाद पालकानी व्यक्त केला.

 

 इ.   पाककृती कार्यशाळा.
                  विद्यालयातील आय. सी. टी. इंस्ट्रक्टर सौ. प्रितम पाटील, गावातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. साधना माळी,  सौ. रेखा पाटील यांच्या मदतीने  विद्यालयातील मुलींसाठी पाककृती कार्यशाळेचे आयोजन केले होते. नाचणा, तांदूळ, मका व परीसरातील सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या यांच्या मदतीने सकस व रूचकर आहार कसा बनविता येईल याचे प्रात्यक्षिक यावेळी करून दाखविण्यात आले. यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थिनीनी सुध्दा त्याना अवगत असलेल्या काही पाककृती करून दाखविल्या. याचा फायदा माता पालकाना घरी झाला. विद्यार्थिनी अगदी स्वेच्छेने घरीसुध्दा आईला स्वयंपाकात मदत करू लागल्या. आपल्या घरी असणाऱ्या धान्यापासूनच रूचकर व पोषक आहार बनविणे शिकल्यामुळे मुलींना घरी नियमितपणे सकस आहार मिळणे सहज शक्य झाले. आपल्या परीसरात उपलब्ध असणारा नाचणा हा सुध्दा कीती पोषक आ हे हे विद्यार्थिनीना समजून आले. यामुळे नाचण्याची काळी भाकरी खाण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुली नियमितपणे डब्यात सुध्दा नाचणीची भाकरी दिसू लागल्या हे ह्या उपक्रमाचे यश म्हणता येईल.

 ई.   भाजी भाकरी खाऊ - सशक्त होऊ.
         श्रावण महिना म्हणजे विविध प्रकारच्या पालेभाज्यानी समृध्द असणारा महिना. विद्यार्थिनीना परीसरातील पालेभाज्याचे महत्व समजावे यासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी चला भाजी भाकरी खाऊ- सशक्त होऊ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी आठवडाभर आधिच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनिना पालेभाज्यांचे महत्व सांगण्यात आले. शाळेतील शिक्षक श्री एस. वाय. पाटील, श्री ए. डी. पाटील व श्री पी. जी. वरेकर आदिंनी परीसरातील पालेभाज्यांचे महत्व विषद केले. विद्यार्थी व विद्यार्थिनिना वेसरफ येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी फक्त परीसरातील उपलब्ध पालेभाज्या व नाचण्याची किंवा तांदळाची भाकरी असा मेन्यू ठरवून देण्यात आला. प्रत्येकाला सहज उपलब्ध होईल अशी पालेभाजी डब्यातून आणावी अशी सक्ती करण्यात आली. कोणीही बाजारात विकत मिळेल अशी भाजी आणावयाची नाही अशी सक्त सूचना देण्यात आली.
प्रत्यक्षात जेव्हा विद्यार्थ्यानी आणलेल्या पालेभाज्यांची नोंद केल्यानंतर सर्वांकडे मिळून एकुण २७ प्रकारच्या पालेभाज्या परीसरात उपलब्ध असल्याचे आढळले. विद्यार्थ्याना ह्या सर्व पालेभाज्या आरोग्यासाठी किती पोषक आहेत याची सविस्तर माहिती शिक्षकानी दिली. परीसरात फुकट उपलब्ध असणारा हा सकस आहार आपल्या ताटात अधिक कसा उपलब्ध होईल यासाठी सर्वानी प्रयत्न करावा असे आवाहन या वेळी विद्यार्थ्याना करण्यात आले.


ऊ.   व्याख्याने
       i.  नाही म्हणण्याची कला     
           त्या वेळी माझं चुकलंच! मी तेव्हाच नाहीम्हणायला हवं होतं; म्हणजे हा पुढचा सगळा त्रास वाचला असता!’’ कुणा एका विशिष्ट माणसाचं, विशिष्ट वेळचं हे वक्तव्य नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांबाबत केव्हा ना केव्हा अशी वेळ येऊन गेलेली आहे. जेव्हा आपल्याला खरं तर नाहीम्हणायचं असतं; पण आपण ते म्हणू शकत नाही आणि मग त्यापायी पुढे बरंच काही सहन करावं लागून पश्‍चात्तापाची वेळ येते.आता नाहीकसं म्हणायचं?  नाहीम्हटलं तर त्याला काय वाटेल? नातं दुरावेल, असा विचार करून आईला दिलेलं आश्‍वासन न पाळता मुली अनेकदा आपल्या मनाविरूध्द वागतात ! मात्र, यातून शेवटी पदरी काय पडतं?  केवळ निराशा, पश्चाताप आणि आई वडिलांचा रोष.  याचा अर्थ असा नाही, की मित्राला कधीच मदत करू नये! अर्थातच परस्परांच्या गरजांच्यावेळी मदत हा तर मैत्रीचा पाया आहे; मात्र केवळ नाहीम्हणता येत नाही म्हणून एखादी गोष्ट नाइलाजाने केली जाते, तेव्हा पश्‍चात्तापाची वेळ येऊ शकते.  एको नकारः शतदुःखहारी! ही संस्कृत उक्ती प्रसिद्धच आहे. योग्य वेळी दिलेला एक नकार हा पुढील शंभर दुःखांचा परिहार करणारा असतो. एखाद्याच्या मागणीला, विचारणेला आपण नकार देऊ, तेव्हा त्या व्यक्तीवर होणारा परिणाम हा या व्यवहाराचा अटळ भाग आहे. हा परिणाम कमीत कमी व्हावा, त्या व्यक्तीचा गैरसमज होऊ नये, अशा प्रकारे नकार देता येणं ही एक कला आहे. म्हणूनच योग्य वेळी नकार द्यायलाच हवा; मात्र तो योग्य प्रकारे देता यायला हवा.
               आज बाहेरच्या जगात हजारो प्रलोभनं आहेत, खूप बऱ्या-वाईट गोष्टीही आहेत; मात्र याच जगात आपल्या मुलाला वाढवायचं आहे. जास्तीत जास्त नीतिमूल्यं त्याच्या मनावर बिंबवायची आहेत, त्याच्यामध्ये उत्तम गुणांचं रोपण करायचं आहे. नकार स्वीकारण्याचीही तयारी हवी. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे घडेलच असं नाही. अनपेक्षितपणे समोरून आलेला नकार मनात प्रचंड उद्विग्नता, दुःख निर्माण करतो. कित्येकदा त्याचं रूपांतर क्रोध किंवा सूडभावनेमध्ये होतं. एकतर्फी प्रेमातून घडणारे गुन्हे हे याचंच प्रत्यंतर आहे. होकार अपेक्षित असलेल्या व्यक्तीकडून मिळालेला नकार पचविणं अवघड तर जाणारच! दुःख, उद्विग्नता याही अत्यंत नैसर्गिक भावना मनात निर्माण होणारच! पण म्हणून मनाचा तोल सुटता कामा नये, विवेकाची कास सुटता कामा नये; अन्यथा अविवेकाचा तो एक क्षण आपल्या संपूर्ण आयुष्याला खोल गर्तेत ढकलण्यास पुरेसा ठरेल. योग्य वेळी नकार देता येणं, योग्य प्रकारे नकार देता येणं आणि मिळालेला नकार योग्य प्रकारे स्वीकारता येणं, हे सुदृढ आणि विकसित व्यक्तिमत्त्वाचं द्योतक आहे. म्हणून योग्य वेळी नकार देणे कधीही श्रेयस्करच असते. हा विचार करून मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील यानी पालक व विद्यार्थिनीना यासंदर्भात मार्गदर्शन केले.
ii आरोग्यविषयक मार्गदर्शन
 विद्यार्थिनिंच्या वैयक्तिक आरोग्यविषयक ग्रामिण रूग्णालय, गगनबावडा येथील वैद्यकिय अधिकारी तथा समुपदेशक शिल्पा लठ्ठे यानी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनिंच्या वैयक्तिक जिवनातील काही समस्या यावरही त्यानी विस्ताराने मार्गदर्शन केले.  विद्यार्थिनिंच्या आरोग्यविषयक अनेक समस्या असतात. पण नेमके त्यांचे समाधान कोणाजवळ होईल याची त्याना माहिती नसते. बऱ्याचवेळा दवाखान्यात जावून आरोग्याच्या तक्रारींचे निराकरण करणे स्त्रिसुलभ संकोच, लज्जा व आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे शक्य होत नाही. बऱ्याचदा याचा परिणाम म्हणून मिळेल ती अशास्त्रिय माहितीच अधिकृत असल्याच्या गैरसमजातून मुलीना आरोग्यविषयक समस्याना तोंड द्यावे लागते. घरी आईकडेसुध्दा शास्त्रिय माहिती उपलब्ध असेलच याची खात्री नाही अशा स्थितीत डॉ. शिल्पा लठ्ठे यानी केलेले मार्गदर्शन मुलीना खूपच सहाय्यभूत ठरले.  वयात येताना मुलींच्या शरिरात होणारे बदल, मासिक पाळी, त्या चार दिवसात घ्यावयाची दक्षता, वैयक्तीक स्वच्छता अशा अनेक मुद्दयावर डॉ शिल्पा लठ्ठे यानी मार्गदर्शन केले.
iii  रूग्णवाहिके संदर्भात मार्गदर्शन.
अत्यावश्यक वेळी रूग्णवाहिका कशी उपलब्ध करायची, रूग्णवाहिकेत कोणकोणत्या सोयी असतात. रूग्णवाहिकेची सेवा नेमकी कशी उपलब्ध होते अशा अनेक बाबीवर मुलींचे शंका समाधान करण्यासाठी तालुक्यातील निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रूग्णवाहिका खास विद्यार्थी व विद्यार्थिनिना माहिती देण्यासाठी शाळेत बोलविण्यात आली. रूग्णवाहिकेतील डॉ. सागर कुंभार यानी रूग्णवाहिके विषयी समग्र माहिती दिली.  कोणकोणत्या वेळी आणि कशाप्रकारे रूग्णवाहिकेची सेवा आपण उपलब्ध करू शकतो ह्याची माहिती त्यानी दिली.  सेवा उपलब्ध करण्यासाठी कोणत्या क्रमांकावर विनंती करायची आदि सर्व माहिती डॉ. कुंभार यानी दिली. कमी मनुष्यबळ उपलब्ध असतानाही रूग्णास स्ट्रेचरवर घालून कशाप्रकारे रूग्णवाहिकेत ठेवता येते याचे प्रात्यक्षिक डॉ. कुंभार यानी करून दाखविले. या उपक्रमामुळे मुलींमध्ये रूग्णवाहिकेविषयी समग्र माहिती मिळाली. पुढील आयुष्यात कधी बाका प्रसंग निर्माण झालाच तर त्या स्वता रूग्णवाहिका बोलावून घेवू शकतील इतकी माहिती यावेळी विद्यार्थिनिना मिळाली.


iv  चला आर्थिक साक्षर बनुया.
बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने विद्यार्थिनिना बँकातील सर्व व्यवहार कसे चालतात याची माहिती देण्यात आली.  खाते उघडणेसाठीचा अर्ज, त्यात भरावयाची माहिती, पैसे काढण्याची, पैसे भरण्यासाठीची स्लिप, चेक, चेकचे प्रकार, डि. डी. म्हणजे काय, चेक क्रॉस करतात म्हणजे नेमके काय करतात आदि शंका यावेळी विद्यार्थिनिनी विचारल्या . बचतीचे महत्व सांगून जनधन योजने संदर्भात माहिती दिली.  अधिकारी वर्गाने विद्यार्थ्याना झिरो बॅलन्स खाती उघडण्यासाठी प्रोत्साहित केले व बँकेची know Your Customer या योजनेविषयी माहिती दिली.

v  माध्यमांचा वापर करताना
                    यंग माइंड्सही आर्यलडमधील मानसिक आरोग्यविषयक कार्य करणारी सामाजिक संस्था असून या संस्थेचे कार्यकारी अधिकारी सराह ब्रेनान यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने हा सव्‍‌र्हे केला. ‘‘किशोरवयीन मुलींच्या अनेक समस्या असतात. या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर त्यांची मानसिक अवस्था बिघडते. मात्र या मुलींच्या मानसिक आरोग्याकडे पालकांचेच लक्ष नसल्याने मुलींचा मानसिक विकार बळावत जातो,’’ असे ब्रेनान यांनी सांगितले. या सव्‍‌र्हेनुसार १३ ते २१ वयोगटातील अनेक मुली (५८ टक्के) मानसिक विकाराच्या शिकार असतात. त्यातील ३७ टक्के मुली सायबरबुलिंगने (इंटरनेट किंवा सोशल मीडियामुळे होणारा त्रास) त्रस्त असतात आजकाल माध्यमांचा वापर ही सुध्दा पालकांच्या दृष्टीने खूपच संवेदनशील विषय बनला आहे. टि.व्ही. वरील हिंसाचार, उत्तान दृष्ये याचा परिणाम शालेय जिवनातील मुलींच्या संस्कारक्षम मनावर निश्चितच होतो. म्हणून टि. व्ही. पहाताना विद्यार्थिनिनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, पालकानी सुध्दा टि. व्ही. चा रिमोट आपल्या हातात ठेवणे किती गरजेचे आहे यासंदर्भात मुख्याध्यापक एस. बी. पाटील यानी मार्गदर्शन केले. माध्यमात सर्वात अधिक कळीचा मुद्दा जर काय असेल तर तो म्हणजे मोबाईल. म्हणून मोबाईलचा वापर करताना घ्यावयाची दक्षता, इंटरनेटवरील धोके,  फेसबुक, व्हाटसअप चा चांगला वापर कसा करता येईल या संदर्भात मुख्याध्यापक एस .बी. पाटील यानी समग्र माहिती दिली. टि. व्हि. व मोबाईल हे आजच्या काळातील गरज होवून बसले आहेत. त्यांचा चांगला वापर केला तर स्वताची प्रगती सुध्दा करता येते. आज जगाला जोडण्यासाठी या गोष्टी अत्यावश्यक आहेत. पण त्यावर पालकांची नजर असणेही गरजेचे आहे. आज मोबाईलच्या माध्यमातून मुलींना कशाप्रकारे फसवणूकीला , अत्याचाराला तोंड द्यावे लागते व  त्यामुळे कशा प्रकारे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते यासंदर्भात विद्यार्थिनीना उदाहरणा सहित मार्गदर्शन करण्यात आले.
vi  वैयक्तीक स्वच्छता
   विद्यार्थिनींच्या चांगल्या आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुण्याचे महत्व व शास्त्रिय दृष्ट्या हात योग्यपद्धतीने कसा धुवायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मुलींना हात न धुतल्यामुळे होणारे आजार याची माहिती सुध्दा देण्यात आली. वेळोवेळी आपली हाताची नखे काढणे, नखाखाली घाण साचू न देणे, दात व्यवस्थित व दररोज सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी घासणे, स्वच्छ कपडे वापरणे, शिंकताना तोंडासमोर रूमाल धरणे,  शिळे व उघड्यावरील अन्न न खाणे अशा विविध विषयावर वेळोवेळी विद्यार्थिनीना मार्गदर्शन करण्यात आले.           

vii  जनजागरण मोहिम
      समाजात  मुलगा व मुलगी असा भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा परिणाम म्हणून देशभरात मुलींची संख्या कमी होत आहे. सरकारने कायदे करूनही स्त्रिभ्रुण हत्या टाळणे शक्य होत नाही. याकरिता मुलगी आणि मुलगा असा भेदभाव न करण्यासंदर्भात विद्यालयातील विद्यार्थिनिंच्या मदतीने जनजागरण फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीतून मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करण्यासंदर्भात ग्रामस्थाना अवाहन करण्यात आले.


viii  वाडी – वस्तितील  पालक मेळावे
       आपल्या पाल्याच्या प्रगतीच्या चौकशीसाठी पालक वेळोवेळी शाळेत येणे गरजेचे असते, पण ग्रामिण भागातील पालक हा आपल्या रोजीरोटीच्या कामात गुंतलेला असतो. वर्षभर शेतीच्या कामात गुंतलेल्या पालकाला शाळेत येवून शिक्षकांची भेट घेणे सहज शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून पालकांची त्यांच्या विद्यार्थिनिंच्या बाबतीत वाडी वस्तीत जावून भेट घेणे व हितगुज साधणे हा मार्ग अवलंबण्याचे पहिल्या माता पालक बैठकीत निश्चित करण्यात आले होते.  या नियोजनाबर हुकूम सबल मुलगी सुरक्षित मुलगी ह्या उपक्रमाचा एक भाग म्हणून पालकांचे वेळोवेळी प्रबोधन करण्यासाठी वाडी वस्तिवर जाऊन पालकांची भेट घेण्यात आली. अनेकदा वैयक्तीक भेटी घेवून तर कधी कधी सामुहिक रित्या पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.  या माध्यमातून  पालकांशी या नवोपक्रमाच्या एकूणच फायद्यासंदर्भातही चर्चा करता आली. शिक्षक व पालक यांच्यामध्ये एक प्रकारचा स्नेह निर्माण होण्यासही ह्या भेटी सहाय्यभूत ठरल्या.

ix  मुलीना सॅनिटरी पॅडचे वाटप
          इयत्ता नववी व दहावीतील मुली म्हणजे वयात आलेल्या मुली. प्रत्येक मुलीला, पाळी म्हणजे काय, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पाळी येणे ही  एक आनंदाचीच घटना आहे. हे तिला समजावून दिले पाहिजे. काही आया आपल्या मुलीला पाळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिक मुलीलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पाळी येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. उलट पाळी न येणे हीच अनैसर्गिक गोष्ट आहे. ३ ते ५ दिवस रक्तस्राव होणे ही एक नैसर्गिक बाब असते. आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्राव होऊ लागला तर मात्र ते अयोग्य असते. हे मुलींना सांगितले पाहिजे.  पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईने मुलीला शिकवायला हवे. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असतांना खूपच दुखते, काहींना फार दुखत नाही. पाळी आलेल्या काळात वैयक्तीक स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे असते. ग्रामिण भागातील स्त्रिया म्हणावी तेवढी काळजी घेत नाहीत, त्यामुळे त्याना अनेक प्रकारच्या आजाराना सामोरे जावे लागते.
             स्वच्छतेच्या सवयी मुलीना लागाव्यात, त्या चार दिवसात नेमकी काळजी घेतली जावी,  वापरायचे कपडे स्वच्छ असावेत ही सवय लागावी यासाठी सॅनिटरी नॅपकिन वाटप हा उपक्रम घेतला. स्थानिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविकेंच्या मदतीने मुलींना यावेळी मार्गदर्शन केले व  त्यांच्या उपस्थितीतच गावातील सरपंच श्री संजय महाडीक यांच्या उपस्थितीत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.

x  आरोग्यासाठी योगा
           वयात येत असताना व वयात आल्यानंतर मुलींना समतोल आहार मिळणे आवश्यक आहे. याकरिता लोहयुक्त खाणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर मुलींच्या शंका-कुशंकांचे निरसन करून, त्यांना योग्य ती माहिती देवून पालकांनी त्यांच्यात आधी सांगितल्याप्रमाणे होणारे बदल समजून घेऊन त्यांचे व्यक्तिमत्व मोकळ्या वातावरणात खुलू दिले पाहिजे. मुलींचे शारीरिक व्यायाम, खेळ व छंद बंद न करता अशा गोष्टींना प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे. शरीराची व मनाची सर्वांगीण वाढ ही सकस आहार, भरपूर व्यायाम व हसरे खेळते, मनमोकळे वातावरण यामध्येच होत असते. या सर्व गोष्टीबरोबर योगा हा सुध्दा खूपच आवश्यक आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय व्यासपिठ मिळवून दिले आहे. सर्व जगभरात योगाचे महत्व पटले असल्यामुळे विद्यार्थिनीनाही योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यालयातील शिक्षक श्री व्ही. आर. नाईक यांचे याकामी खूप सहकार्य झाले. त्यांनी मुलींना आरोग्यासाठी योगा या विषयावर मार्गदर्शन केले.
lp20 









१२. नवोपक्रम पूर्ण झाल्यानंतरची निरीक्षणे व त्याच्या नोंदी
              सबल मुलगी सुरक्षित मुलगी हा उपक्रम शैक्षणिक वर्ष २०१५-१६ च्या दुसऱ्या सत्रात सुरु करण्यात आला. उपक्रम सुरु केला तेव्हा उपक्रमाच्या संदर्भात कोणकोणते उपक्रम राबवायचे हे जवळपास निश्चित  होते, तथापि त्यांच्या  फलनिष्पती बाबत मात्र शंका मनात होती. तथापि एकूणच आज मुलींच्या एकूण वर्तन बदलातील आढावा घेतला तर हा उपक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल.
 सर्व साधारण पणे पुढील गोष्टी ह्या आढळून आल्या
आरोग्यविषयक
किशोरवयीन मुलींच्या समस्या संदर्भातील काही व्याख्याने, व्हीडीओ इ. च्या माध्यमातून विद्यार्थिनिना केलेल्या मार्गदर्शनामुळे, मुलींच्या आरोग्यविषयक  समस्या, वयात येताना मुलींच्या शरिरात होणारी वाढ, भावनिक वाढ यासंदर्भातील शंकांचे निरसन झाल्याचे जाणवले. मुलीना आपल्या आरोग्याविषयी काळजी असल्याचे जाणवते. दूपारच्या वेळी दूकानाकडे वळणारी मुलींची पावले मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.  मुलींनी जाणिवपूर्वक आपल्या जेवणात सकस आहाराचा समावेश केला असल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून जाणवले. नखे काढणे,   वैयक्तीक आरोग्याची काळजी  घेणे, वैयक्तीक स्वच्छता अशा बाबींमध्ये सकारात्मक वाढ झाली असल्याचे जाणवले.
व्यक्तिमत्व विकासा संदर्भातील -
इ. नववी व इ. दहावीच्या वर्गातील मुलीं पूर्वीपेक्षा अधिक बोलक्या , उत्साही, प्रसन्न व्यक्तीमत्वाच्या, जिज्ञासू, खेळकर बनल्या असल्याचे जाणवले.
मुलीना संरक्षण कलेची माहिती झाल्यामुळे एखाद्या कठीण प्रसंगात इतर कोणी मदतीला नसेल तर स्वताच स्वताचे संरक्षण करणे त्याना शक्य होईल असा आशावाद त्यांच्या मनात निर्माण झाला.
या नवोपक्रमामुळे मुलींच्या व्यक्त होण्यात चांगली वाढ झाली आहे. मुलींसाठी आयोजित केलेल्या पारंपारीक खेळांच्या स्पर्धेत जवळपास सर्वच मुली सहभागी झाल्या,  इतर कोणत्याही उपक्रमात आजपर्यंत एकदाही सहभागी न झालेल्या मुलींचा सहभाग हा आश्चर्यकारक होता.
बँकेतील व्यवहार कसे चालतात याची माहिती विद्यार्थिनिना करून देण्यात आली. या माहितीचा त्यांच्या जिवनात उपयोग होईल.
उपलब्ध साहित्याचा वापर करून पोषक आहार कसा बनवायचा, आपल्या परीसरात उपलब्ध असणाऱ्या पालेभाज्यांचे पोषण मुल्य  याचे ज्ञान मुलीना झाले.
जाणिव जागृती विषयक -
घरात मुलांच्या तुलनेत अनेक वेळा मुलगी म्हणून आपल्यावर अन्याय होतो, याची जाणिव मुलीना या नवोपक्रमामुळे झाली.  पालक प्रबोधनात सुध्दा याविषयावर वाडी वस्तीतील भेटीदरम्यान भर देण्यात आला, याचा परीणाम निश्चितच काही प्रमाणात चांगला झाला.
किशोरवयीन मुलींच्या संदर्भात शासनाने केलेल्या कायद्यांची माहिती व  Child Line 1098 या Help line विषयी मुलीना माहिती देण्यात आली. भविष्यात निश्चितच या माहितीचा उपयोग होईल असे मुलींशी केलेल्या चर्चेतून जाणवले.
      आपणास न आवडणाऱ्या गोष्टी घडल्याच तर त्या संदर्भात तात्काळ आपल्या पालकांशी, शिक्षकांशी बोलले पाहिजे याची जाणिव विद्यार्थिनिना झाली.
एकूणच या नवोपक्रमाचा फायदा विद्यार्थिनींना झाल्याचे जाणवते.









नवोपक्रमाच्या कार्यवाहीत आलेल्या अडचणी व निवारण          
      सबल मुलगी सुरक्षित मुलगी हा नवोपक्रम राबवित असताना नवोपक्रमकर्त्यास काही अडचणीना सामोरे जावे लागले. तथापि नवोपक्रमकर्त्याने त्यावर उपाययोजना करून त्या अडचणी दूर करण्यात यश मिळविले. नवोपक्रमात कार्यवाहीत आलेल्या अडचणी व त्यांचे निवारणासाठी केलेली उपाययोजना पुढील प्रमाणे.
१.                  जरी आपण २१ व्या शतकात वावरत असलो तरीही मुलगा – मुलगी असा भेदभाव हा घरोघरी होतच असतो.  याला काही सन्माननिय अपवाद असतीलही. पण ग्रामिण भागातील मुलीना आपल्यावर अन्याय होतोय याची मुळी जाणिवच नव्हती.
गैरसमज दूर करण्यासाठीचा उपाय-   नवोपक्रमकर्त्याने एक प्रश्न मुलीना विचारला, समजा टिव्ही. वर भारताची बांग्लादेश बरोबर  क्रिकेट ची मॅच आहे .  आणि त्याच वेळी  टिव्ही वर एक शैक्षणिक कार्यक्रम आहे. तुम्हाला (मुलीना) शैक्षणिक कार्यक्रम पहायचाय पण तुमच्या भावाला क्रिकेटची मॅच पहायची आहे. या स्थितीत टिव्हीवर नेमका कोणता कार्यक्रम सुरु होईल, यात पालकांची भूमिका काय असेल, यावेळी बहुतांशी मुलीनी टिव्हीवर क्रिकेटची मॅच लागेल आणि पालक सुध्दा मुलीचीच समजूत काढून शांत रहायला सांगतील. असे उत्तर बहुतांशी मुलीनी दिले.
२.                  स्त्री सुलभ लज्जा –  ग्रामिण भागातील मुली काही विषयावर मोकळेपणाने बोलतच नाहीत. मुलींच्या समस्या शोधण्यासाठी ठेवलेल्या समस्या शोध पेटीच्या माध्यमातून एकाही मुलीने समस्या मांडली नाही.
           समस्या शोधण्यासाठीचा उपाय -   समस्या शोध पेटीतून समस्या समोर येत नाहीत असे लक्षात आल्यानंतर शाळेतील आय. सी. टी. लॅबच्या इंस्ट्रक्टर सौ. प्रितम पाटील यांची नवोपकर्त्याने मदत घेतली. व त्यांच्या सहकार्याने समस्या शोधण्याचा प्रयत्न केला. काही समस्या शोधण्यासाठी नवोपकर्त्याने प्रश्नावलीची मदत   घेतली.
३.                     पालकांची उदासिनता – मुलींच्या सुरक्षिततेसाठी चिंतेत असणारे पालक ह्या नवोपक्रमाबाबत मात्र उदासिन असल्याचे जाणवले. एकूणच नवोपक्रमाबाबतचे अज्ञान यातून दिसून येत होते.
            पालकांतून सहकार्य मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न – देशात आणि महाराष्ट्रात महिला आणि मुलीवर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराची काही उदाहरणे देवून, असा प्रसंग आपल्या मुलींवर येवू नये म्हणून शाळा पालक यानी एकत्र येवून काम करणे किती गरजेचे आहे यासंबंधी पालकांचे प्रबोधन केले. यानंतर वाडी वस्तीवरील पालक भेटी दरम्यान मिळालेला प्रतिसाद पहाता पालकांतील नवोपक्रमाबाबतीत असलेली उदासिनता नाहीशी झाली असल्याचे दिसून आले.
              
४.                 व्याख्यांत्यांची उणिव – मुलींना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामिण भागात व्याख्यात्यांची उणिव जाणवली. त्याना द्याव्या लागणाऱ्या मानधनाचीही समस्या होती.
       व्याख्यात्यांची उपलब्धता विनाखर्चिक करण्यासाठी केलेली उपाययोजना – विविध विषयावरील व्याख्याने देण्यासाठी शासकिय कार्यालयातील अधिकारी वर्गाला आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या कामाचाच भागामध्ये  जनजागृती असल्यामुळे त्यासाठी त्याना वेगळे मानधन द्यावे लागले नाही.  पाककृती कार्यशाळेत मार्गदर्शनासाठी गावातीलच पाककलेत तरबेज महिलाना आंमत्रित करण्यात आले होते. सौ. साधना माळी, सौ. रंजना गुरव, सौ. प्रितम पाटील इत्यादीनी कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता आनंदाने विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.  आरोग्यविषयक  मार्गदर्शनासाठी ग्रामिण रूग्णालय, गगनबावडा, प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे, गारिवडे व स्थानिक डॉक्टर सागर कुंभार यांची मदत घेण्यात आली. त्यानीही विना मानधन काम मार्गदर्शन केल्याने खर्चाची तजविज करावी लागली नाही. संरक्षण प्रशिक्षणासाठी प्रशिक्षिका सौ. कुलकर्णी ह्यांची सोय जिल्हा परीषद सदस्या सौ. प्रिया प्रकाश वरेकर यानी जिल्हा परीषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून करून दिली. त्याना नवोपक्रमकर्त्यास कोणतेही मानधन द्यावे लागले नाही.













नवोपक्रमाची यशस्विता -

              मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज ता. गगनबावडा जि. कोल्हापूर या  विद्यालयात सबल मुलगी – सुरक्षित मुलगी हा नवोपक्रम पूर्ण करण्यात आला. या उपक्रमाच्या अखेरीस इयत्ता नववी व दहावीच्या वर्गातील मुलीच्या निरीक्षणातून, पालकांशी व शिक्षकांशी झालेल्या चर्चेतून उपक्रमा विषयीचे यश स्पष्ट झाले. नवोपक्रमाची यशस्विता स्पष्ट करण्यासाठी  पुढील मुद्दयांचा उल्लेख करावा वाटतो.
१.                  नवोपक्रमाच्या अखेरीस इ. नववी व इ. दहावी तील मुली सुध्दा बोलक्या, खेळकर, उत्साही, जिज्ञासू बनल्याचे दिसून आले.
२.                 मुली आपल्या समस्या शाळेतील आय. सी. टी. लॅबच्या शिक्षिका सौ. प्रितम पाटील यांना सांगू लागल्या. न बोलणाऱ्या मुली सुध्दा धाडसाने डॉक्टरना आपल्या शंका विचारू लागल्या
३.                 मुली शाळेतून दुपारीच घरी परत जाण्याच्या प्रमाणात लक्षणिय घट झाली.
४.                 मुलींच्या  खाण्यात जंक फूडचे प्रमाण कमी झाले. दुपारी डब्यात नाचणीची भाकरी खाण्यात टाळणाऱ्या मुली आवर्जून नाचणीची भाकरी आणू लागल्या.
५.                मुली वैयक्तीक आरोग्याच्या बाबतीत जास्त जागृत दिसत आहेत. वेळच्या वेळी नखे काढणे, केस विंचरणे, वागण्यातील टापटिप असे बदल सर्वच शिक्षकाना ठळक जाणवले.
६.                शाळेतील कार्यक्रमात मुली मोठ्या उत्साहाने सहभागी होवू लागल्या, ऑक्टोबर महिण्यातच शाळेत आयोजित केलेल्या पारंपारीक खेळ स्पर्धेत इ. नववी  व दहावीच्या मुलीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
७.                घरात आपल्यावर अतिरिक्त बंधने आहेत, मुलग्याच्या तुलनेत आपल्याला सापत्न वागणूक मिळते ह्याची जाणिव मुलीना झाली. त्यामुळे हळूहळू त्यानी त्यावर पालकांकडे आपली नाराजी व्यक्त केल्यामुळे पालाकांनाही आपल्या दृष्टीकोनात बदल करावा लागला.
८.                 किशोरवयीन मुलींच्या संदर्भात शासनाने केलेल्या कायद्यांची माहिती मुलीना करून देण्यात आली.  Child Line 1098 याविषयी मुलीना आता माहिती आहे.  मुली आता आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी पालकांशी बोलतात.
९.                 पालक आता मुलींची विचारपूस करतात. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात
१०.             मुलीना संरक्षण कलेचे प्रशिक्षण देण्यात आले. बहुतांशी मुलीमध्ये यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला.
११.             बँकेतील व्यवहार कसे चालतात मुलीना माहिती झाली. शाळेतील बहुतेक सर्वच मुलींचे बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया या निमित्ताने सुरु झाली.
१२.             घरी उपलब्ध साहित्याचा वापर करून पोषक आहार कसा बनवायचा याचे ज्ञान मुलीना झाले. परीसरातील पालेभाज्यांची माहिती मुलीना झाली.
१३.             पालकांचा मुलींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल झाला. मुलगी म्हणजे ओझे, मुलगी म्हणजे आयुष्यभराची काळजी ह्या विचारात बदल झाला. शिक्षकाना सुध्दा मुलीमधिल हा बदल खूपच भावला, मुली ह्या बोलक्या बनल्यामुळे त्यांच्या शंका विचारण्याच्या संख्येत खूपच वाढ झाली. याचा परिणाम म्हणून अध्ययन प्रक्रिया चांगली होवू लागली याचा फायदा प्रत्यक्षपणे शिक्षकाना झाला.
१४.            मुलींकडे पाहण्याच्या मुलांच्या दृष्टीकोनात सुध्दा चांगला बदल जाणवला. आपल्या शाळेतील मुलींच्या रक्षणाची आपलीही जबाबदारी आहे याची जाणिव मुलांमध्ये निर्माण झाली.
१५.            या नवोपक्रमामुळे समाजाचा शाळेतील इतर उपक्रमांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातसूध्दा चांगला बदल झाला. शाळा ही आपल्या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असतात असा विश्वास पालकांच्या मनात निर्माण झाला.





                                        


                                         संदर्भ
१.      ना. के. उपासनी, . शैक्षणिक कृती संशोधन. पुणे श्री विद्या प्रकाशन.
२.      लिला पाटील, विश्वंभर कुलकर्णी. - आजचे शिक्षण, आजच्या समस्या. पुणे विद्या प्रकाशन.
३.      एम. जी. मराठे. होईन मी स्वयंसिध्दा. पुणे -  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.
४.      सिध्दराज माशाळे.  शैक्षणिक नवोपक्रम
Web-Sites
१.     www.vikaspedia.in




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सबल मुलगी सुरक्षित मुलगी

सबल मुल गी- सुरक्षित मु लगी                                                                                   उपक्रमक...