मुक्त चिंतन
लेखन
श्री एस. बी. पाटील
मुख्याध्यापक
मा. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक
विद्यालय, असळज.
ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर
09421288691
१
अनेकदा जीवनात
आपण जे ठरवतो तसे घडतेच असे नाही. अनेकवेळा आपल्या ईच्छा फलद्रूप न होण्यामागे आपल्या हाताबाहेरील कारणे असू
शकतात, तशीच काही कारणे आपणास्वताशी निगडीत सुध्दा असतात. आपल्या इच्छा वास्तवात
उतरण्यासाठी आपण स्वता कसे प्रयत्न करतो यावरही बरेच काही अवलंबून असते.
प्रयत्नांती परमेश्वर असे आपण म्हणतो, पण तसे न घडण्यास ब-याच वेळा आपण स्वता जबाबदार असतो.
आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो, ध्येय गाठण्यासाठी आवश्यक क्षमता सुध्दा आपल्या अंगी असते. तरीही काही वेळा
आपणास अपयश का येते, या प्रश्नाच्या तळाशी जाताना एक गोष्ट अधिक ठळक पणे जाणवते ती
म्हणजे, विशिष्ट ठिकाणी पोचल्यावर आपल्यात अल्पसंतुष्टता निर्माण होते ही, आणि हाच आपल्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतो.
आपण वाघाची शिकार करण्यासाठी निघालेलो असतो आणि
फक्त सशाची शिकार आपणास सुखावते, आपणास एव्हरेस्ट
शिखर सर करायचे असते. ती क्षमता सुध्दा आपल्यात असते, आपली तयारीसुध्दा चांगली असते, पण एव्हरेस्ट शिखराऐवजी आपण आपल्या गावाजवळील
एखादी टेकडी चढूण जातो आणि त्यातच समाधान मानतो. आणि त्यामुळे या अल्पसंतुष्ट वृत्ती मुळेच
एव्हरेस्ट कायमच आपल्यापासून दूर रहाते.
एखाद्या हुषार विद्यार्थ्याने गणितात शंभर गुण मिळविण्याची
क्षमता असूनही जर पस्तीस गुणाचाच पेपर सोडवला तर त्याला शंभऱ गुण कसे बरे मिळतील.
अनेकदा एखादा धोका स्विकारायला लहानमुलांचेच
नव्हे तर मोठ्यांचेही मन तयार होत नाही. प्रत्येकाला सुरक्षित जिवन जगायला आवडते, पण ही आवड थोडी बाजूला ठेवून जो थोडा धोका पत्करायला तयार होतो तोच एव्हरेस्ट शिखऱावर झेंडा रोवू शकतो.
आयुष्यात आपण
जेव्हा स्थिर स्थावर होतो तेव्हा नवीन काही करण्यासाठी आपले मन तयार होत नाही. स्वतःभोवती आपण विणलेला सुरक्षिततेचा कोष भेदून
बाहेर पडण्याचा विचार आपणास घाबरवून टाकतो.
म्हणून मला
नेहमी असे वाटते की, आपण जेव्हा बेरोजगार असतो, तेव्हा प्रगतीची
खूप मोठी संधी आपल्याला असते. एकदा का आपण स्थिर स्थावर झालो की मग आपल्यातील
धाडस कमी होते.
म्हणून आज
तुम्ही जे काही अहात त्याचा अभिमान जरूर बाळगा, पण तुमच्या जीवनाचे जे ध्येय आहे ते कधी विसरू
नका, तुमचे जीवनध्येय तुम्ही निश्चितच साध्य करणार अहात याविषयी विश्वास बाळगा. आणि कार्यरत रहा,
२
अनेकदा ज्या
घटना आपणासाठी कोणत्याही अंगाने महत्वाच्या नसतात अशा घटनांचा आपण खुप विचार करतो. काही वेळा आपल्या आयुष्यात ज्या मुळे किंवा
ज्यांचा मुळे अजिबात काही फरक पडणार नसतो अशांचा (वस्तू किंवा
व्यक्ती) आपण खूप संग्रह करतो.
कधीतरी उपयोगी
पडेल म्हणून आपण निरूपयोगी वस्तू देखील जपून ठेवतो, अर्थात वस्तू जपून ठेवण्याची सवय चांगली आहे, मात्र अशा अनेक वस्तू जपून ठेवल्याने कधी कधी
नेहमी वापरातील वस्तू ठेवायला जागा मिळत नाही, किंवा महत्वाची वस्तू त्या मध्ये हरवून जाते. या अशा जपून
ठेवलेल्या पण वापरात नसलेल्या वस्तूंची अखेर अडगळ बनते.
काही वेळा आपण घरातील ही अडगळ काढून टाकायचे ठरवतो, सर्व अडगळ समोर घेऊन बसतो आणि प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता पाहून वर्गवारी करतो, पण शेवट काय होतो, अडगळ आहे तशीच रहाते, फक्त ढिग हलतो, त्यावरील धूळ हटते आणि आपला वेळ जातो यापेक्षा वेगळं काही घडत नाही.
आपली नेहमीची ऑफिस बॅग जरी पाहिली तरी या गोष्टीची सत्यात पटते.
काही वेळा
निरूपयोगी वस्तू मध्ये सुध्दा आपल्या भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे अडचण होत असली तरी ती वस्तू टाकून
द्यावी असे वाटत नाही.
मोबाईल मध्ये
सेव्ह केलेल्या नंबर च्या बाबतीत सुध्दा असंच असतं.
माणसांच्या
बाबतीत सुध्दा असंच असतं असं मला वाटते.
आपण आपल्या
भोवती अक्षरशः काही अडगळ वाटावी अशी माणसं जमवलेली आणि जपलेली असतात. जी कधी उपयोगी पडलेली नाहीत, भविष्यात सुध्दा उपयोगी पडणार नाहीत, जी असली नसली तर
काहीच फरक पडत नसतो. जी केवळ अडचण बनून राहिलेली
असतात आणि तरीही जर तुम्ही त्याना सांभाळत असाल, त्यांचा विचार करत असाल, त्यांना वेळ देत
असाल. .... तर थोडा विचार करा. जेव्हा तुम्ही
अशा माणसांना वेळ देता तेव्हा निश्चितच तुमच्या चांगल्या माणसाला तुम्ही हवा तेवढा
वेळ देवू शकत नाही. अशी माणसं फक्त गर्दी बनून रहातात, आणि या गर्दीत आपली जिवाभावाची, चांगली, अडचणीत उपयोगी
पडणारी, आपल्यावर प्रेम करणारी माणसं कधी हरवून जातात
कळत देखील नाही.
आपण दसरा, यात्रा यानिमित्ताने ब-याचदा घरातील
अडगळ काढतो. पण मनातील अडगळ दूर कधी करतो? कधीतरी थोडी सवड काढावी, मारावी बैठक आणि करावी अशी
अडगळ ठरू शकणाऱ्या माणसांची यादी. आणि मग त्याना एका विशिष्ट अंतरावर ठेवा
(लक्षात असूद्या सुस्पष्ट दृष्टीचेही एक लघुत्तम अंतर असते), तुमच्या सभोवताली थोडी जागा मोकळी ठेवा, तुमच्या
चांगल्या, आपल्या, प्रेमळ, नात्यातील माणसांसाठी.
या अशा माणसांची
दररोज नियमितपणे आठवण काढा, मैत्री सर्वांशी करा पण वर्तुळात कोणाला घ्यायचे
ह्याचा निर्णय मात्र अत्यंत डोळसपणे घ्या. कारण सर्वात अधिक त्रास
तेव्हाच होतो, जेव्हा तुम्ही ज्याना आपले माणलेले असते आणि तेच तुम्हाला धोका
देतात तेव्हा, म्हणून तुम्ही केवळ आणि केवळ फक्त अशाच माणसांवर विसंबुन रहा जे
तुम्हाला त्यांचा प्राण गेला तरी धोका देणार नाहीत. छत्रपती संभाजी राजानी कवी
कलशाला आपला मानला त्याला जवळ केले, जग कवी कलशाला नावे ठेवत होते. पण कवी कलशाने
मात्र आपल्या अखेरच्या श्वासांपर्यंत छत्रपतीना साथ दिली सोबत दिला कधीही धोका
नाही दिला. म्हणून थोडी अडगळ दूर करा, जर मोकळा श्वास घ्या आणि डोळे उघडून पहा
सभोवती तुमच्या वर्तुळात परके तर नाहीत ना.
३
बघा एक दिवस
स्वतःसाठी जगता येते का.....
तुम्हाला नाही
जमायचं ते .....
जमेल म्हणता...?
पहा हं मी काय
म्हणतोय ते....
स्वतःसाठी जगा....फक्त एक दिवस. ...तरी
आज इतर कोणाचाही
विचार नका करू, जे तुम्हाला आवडते ते करा....
.
.
.
बघा जमतंय काय. ....
मला तरी वाटते
तुम्हाला नाही
जमायचं ते.
..
असो
किमान एक दिवस
तरी स्वतःसाठी जगता यावे यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा. ...
आजचा दिवस
सार्थकी लागो......
४
आज रविवार, सुट्टीचा दिवस. ....
काही तरी नियोजन
असेलच की तुमचं?
काहीच नाही. .?
भरपूर कामे आहेत. ..?
काम तरी खूप आहे, पण सुरूवात कोठून करावी कळत नाही. ..?
वरील तिन्ही
पैकी काहीतरी असू शकेल. ....
मला जर विचाराल
तर मी आज दिवसभर पूर्णपणे मोकळा आहे. आज थोडं उशीराच उठलोय. .... अंघोळ आटोपून पहिले काम जवळपास सर्वजण देवाला
नमस्कार करून करतात, मी तुम्हाला शुभप्रभात म्हणून करतो. आणि आता तेच करतोय. ह्या नंतर चहा पिईन म्हणतोय. मग माझ्या गावी ढोणेवाडी ला जायचं
म्हणतोय, तिथं काही काम नाही माझं, पण मित्र आहेत
त्याना भेटून थोड्या गप्पा मारणे आणि घरासमोर लावलेल्या रोपांना पाणी घालणे एवढे
तिथं जाऊन करावे म्हणतोय. रोपं आणि मैत्री जगवायची असेल तर त्यांच्या कडे
दूर्लक्ष करून चालत नाही, नाहीतर दोन्ही कोमेजून जातात, आणि मग पुन्हा तिथे हिरवळ निर्माण करण्यास अधिक
कष्ट घ्यावे लागतात, वेळ गेल्यावर भरपूर कष्ट घेऊन सुध्दा रोपांना
आणि मैत्रीला पुन्हा धुमारे फुटत नाहीत, अशावेळी केवळ आपण आणि आपणच दोषी असतो... म्हणून मी रोपांना पाणी आणि मैत्रीला खतपाणी वेळोवेळी घालत रहातो...
खूप लक्ष देउनही रोप जगत नाही, त्यावेळी थोडं वाईट वाटते पण ज्या वेळी एखादे जगलेले, छान फोफावलेले, थंडगार सावली देणारे आणि आपणास विशेष आवडणारे एखादे रोप आतून वाळत येते किंवा अचानक तुमच्या मनीमानसी नसतानाही कोलमडून पडते, अक्षरशः उन्मळून पडते तेव्हा ....?
तेव्हा काय होते तुमच्या मनाची अवस्था. ....?
खूप खूप वाईट
वाटते ना?
वाटतेच हो.....
रोपं काय आणि
मैत्री काय दोन्हीचा अंत वाईटच, मी वाचलंय की मित्रांचा अंत झाल्यावर जेवढे वाईट
वाटते ना त्यापेक्षा अधिक वाईट मैत्रीचा अंत झाल्यावर वाटते. ..... खरंच आहे हे. ..... शपथेवर सांगतोय...... खरंच आहे हे, अगदी शंभर टक्के खरं.... अनुभवाचे बोल आहेत हे. .....
असो...
आज रविवार, सुट्टीचा दिवस. ... थोडा वेळ काढा... मित्रांना एखादा फोन करा, किमान एखाद्या
शुभ संदेश पाठवा... गेलाबाजार एखादा मिसकाॅल तरी करा हो....
आपण ह्या
सगळ्यातून एक निश्चित सांगू शकतो, मला आता ह्या क्षणी तुझी / तुमची आठवण
येतेय. .... आणि खरंच सांगु.... कोणीतरी,
कोठेतरी अगदी
दूर असलेली व्यक्ती आपली आठवण काढतेय ही भावना खूप सुखावणारी असते हो.... आणि अशा भावना मानसाला जगण्यासाठी उमेद देतात, कारण देतात. .... कोणीतरी आपलं आहे ही भावनाच मुळी सर्व नात्यांच्या मुळाशी असते. ही भावना नसेल तर नाते फक्त नावालाच उरते.
५
आपण आपले समाधान
दुस-या हाती सोपवलेले असते, कुणीतरी चांगलं
म्हंटलं, कुणी चांगलं बोललं, कुणी चांगलं ब-याच दिवसांनी
भेटलं, चांगलं वाचण्यात, खाण्यात, बघण्यात आलं तरीही माणूस आनंदी होतो.
दुस-या कोणाचंतरी समाधान सुध्दा आपल्या वागण्यावर
अवलंबून असु शकते. त्याचा शोध घ्या, पैसा सुध्दा
ज्या साठी खर्च करावा लागत नाही असे हसू त्याला पहाताच तूमच्या चेह-यावर खुलू द्या, चांगलं बोलण्यासाठी, विचारपूस
करण्यासाठी स्वता पुढाकार घ्या.
लक्षात ठेवा वेळ
बदलतो,
पण आठवणी बदलता
येत नाहीत,
म्हणून आपण
आपल्या माणसाबरोबर नेहमी चांगलं वागुया.
थोडक्यात
लिहीताना काही गोष्टी असंबद्ध वाटण्याची शक्यता आहे, मात्र मला जे काही म्हणायचे आहे ते तुम्हाला
निश्चितच समजले असणार, तुम्ही नाही तर मग कोण समजून घेणार?
६
आपण काय आहोत हे
आपण जाणतो,
मात्र काय
होउ शकतो हेच आपण जाणू शकत नाही.
.
आणि
जर हे जाणायचे
असेल.
...
तर....
तुम्ही जे काही
अहात त्याचा अभिमान बाळगा, आणि तुमच्या कडे ज्या काही क्षमता आहेत त्यांचा पुरेपुर वापर
करा......
एक दिवस
निश्चितच असा येईल, फक्त तुम्हीच नव्हे तर सारे जग जाणेल..... तुम्ही काय बनू शकता ते.
.
.
.
नवं काहीतरी
शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी
:
जो पैसे हरवतो... तो निश्चितच काही हरवून जातो. जो मित्र हरवतो ...तो अधिक काही हरवून बसतो ..... आणि जो विश्वास गमावून बसतो तो सर्वच हरवून जातो. ..: कधी कधी काय बोलावे हे कळावे लागते.
कधी कधी काय
बोलू नये हे ही कळावे लागते..
बर्याच वेळा
काही न बोलणेच शहाणपणचं ठरतं .....
पण.... ते ही कळावे लागते
जर आपण
स्वतःसाठी थोडा वेळ देवू शकलो तर आपले मन आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकेल. आणि जर आपल्याला भेडसावणा-या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळाले तर.......?
तर मग तुम्ही
निश्चितच सुखी व्हाल. ......
.
.
.
.
पण आधी
स्वतःसाठी वेळ द्या. ...
थोडं अंतर्मनात
डोकावून पहा......
.
.
.
यासाठी यापेक्षा
अधिक चांगली वेळ कोणती....?
सुखी जीवनासाठी
खूप थोडं गरजेचं असतं.
आणि जे गरजेचे
असते ते तर आपल्या मनातच असते.
आपल्या विचार
करण्याच्या पध्दतीत असते....
सुखी होण्यासाठी
तुम्ही काय काम करता ते महत्वाचे नाही, पण जे करता ते जर आवडीने व ह्रदयापासून करत असाल
तर तुम्ही निश्चितच सुखी व्हाल.
७
एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी १२ वाजले होते. रणरणत्या उन्हान
बेजार केल होत. एक साधू या मार्गागारून तीर्थयात्रा करत
डोंगरावरील देवीला जात होता. त्यच्या जवळ तों शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक
कमंडलू, एवढच समान होत. पण रस्त्याच्या
चढणीमुळे त्याला एवढं समान ओझं वाटत होत, आणि घामाच्या धारा त्यांच्या अंगावरून वाहत
होत्या. थोडं पुढ गेल्यावर त्याला एक ७० वर्षाची आदिवासी
महिला ८ वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय
उतारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा
धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठ्या उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
साधून त्या
महिलेला विचारलं,"आजी इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही ही उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढ्याशा ओझ्यान हैराण झालो आहे." त्या वृद्धेन साधूना नीट निरखून पाहिलं, आणि म्हणाली, "महाराज ओझं आपण वाहत आहात, हा तर माझा नातू आहे!"
८
काही लोक
बसस्थानकावर बसची वाट पहात तास, अर्धा तास थांबतात. बसची वाट पाहून
कंटाळून शेवटी बसतात, पण बस मात्र कधी वेळेवर येत नाही. काही लोकांच्या भाग्याचं मात्र कौतुक वाटतं मला. ते येतात अगदी राजेशाही थाटात आणि जणुकाही
त्यांच्या साठी लेट झालेली बस येते, बसमध्ये ह्याच
लोकांना बसण्यासाठी जागा मिळते. नशीब नशीब म्हणतात ते दुसरं काय असतं. मला वाटते अशा
लोकांनी महाराष्ट्र राज्य लाॅटरीचे तिकीट काढलं तर त्याना निश्चितच एकसामायीक बक्षिस मिळेल. असतं बेटं एकेकाचं नशीब.
अहो आतातर
प्रवासात मोबाईल चार्ज करण्यासाठी पोर्ट मिळणे ही सुध्दा नशीबाची बाब आहे.
मी सुध्दा असा
नशीबवान आहे. नाहीतर तुमच्या सारखे मित्र अशा तशाना सहज कसे
लाभतील. (लाभतील हा शब्द मी जाणीव पूर्वक वापरला आहे, नाहीतर मी मिळतील हा शब्द सुध्दा वापरू शकलो
असतो )
असो, आज आठ मार्च जागतिक महिला दिन.
परवाच मोदी
म्हणून गेले, महिलांना सबला करणारे पुरूष कोण, महिला ह्या मुळातच सबला असतात. मी टीव्ही वरील
पारस वाहिनी वरील प्रवचने अनेकदा ऐकतो, एका
जैन गुरू नी अबला या शब्दाची फोड खूपच छान केली होती. बला म्हणजे संकट आणि अबला म्हणजे (अ बला) संकट नाही ती. ह्या अर्थाने
पाहिलं का हो कधी आपण महिलांकडे. आज पुन्हा एकदा वेळ आली आहे हा अर्थ सर्वांना
सांगण्याची, आणि हाच अर्थ सार्थ आहे हे सिद्ध करण्याची.
असो महिलां खेरीज घर, ह्रदय, भावना, सण समारंभ, नाती सर्व काही अधुरे अधुरे वाटते. जगण्याला बळकटी देतात त्या महिला, महिला जगण्याला अर्थ प्राप्त करून देतात, शरीरातील प्राण म्हणजे महिला, स्वप्नाना रंग भरतो तो महिलांच्या मुळे (संशोधकानी सिद्ध केलंय की स्वप्ने ही ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतात म्हणे, कदाचित त्यानी प्रयोग करताना ज्यांच्या जीवनात महिला आली नाही अशी माणसं निवडली असावीत). महिला म्हणजे मंदिरातील अगरबत्ती असते, मन प्रसन्न करून सोडते (पण यासाठी ती मात्र स्वतःला जाळून घेते), महिला म्हणजे वाळवंटातील ओयॅसिस असतात, थकले भागलेल्याला घरी (स्वतःच्या) गेलं की ओयॅसिस गवसल्याचा आनंद होतो.
९
काही वेळा माणूस
त्याच्या कामात अपयशी ठरतो, अपयश पचवणं अनेकदा शक्य होत नाही, काही जण रडतात, कोलमडून पडतात, प्रयत्न सोडून
देतात, जागीच थांबतात, मागे फिरता, काही तर खूपच
निराश होतात आणि अकाली Exit घेतात.
पण यापैकी
कशानेही मुळ समस्या सुटत नाही. प्रयत्न करत रहाणे हेच शहाणपणाचे असते.
Crying आणि Trying या दोन शब्दात फरक फक्त एका अक्षराचा आहे. Crying मुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो, तर Trying मुळे आत्मविश्वास पुन्हा निर्माण होतो.
आपण नेहमी Trying हाच पर्याय निवडा
१०
गैरसमज हे
एखाद्या पक्षा सारखे असतात.
आपल्या सभोवती
हवेत संचार करण्यापासून आपण त्याना रोखू शकत नाही. .
तथापि. ...
आपल्या मनात घर
करण्यापासून मात्र आपण त्याना निश्चितच रोखू शकतो.
.
.
.
.
आणि ह्यात
जेव्हा आपण यशस्वी होतो...
तेव्हा. ...
....तेव्हा प्रत्येक सकाळ ही आपल्या साठी केवळ शुभ असते. .........
डोळे कितीही
छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं
आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक
देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची
मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून
आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.....
आठवणी ह्या
मधमाशीच्या पोळ्यासारख्या असतात. ..
एकदा जाग्या
झाल्या की, बराच वेळ मनात घोंघावत रहातात. ..
कधी त्यांच्या
दंशामुळे वेदना होतात. ...
तर कधी त्यातील
गोडव्यामुळे मन हरखून जातं....
आपली आठवण मला
नेहमी सुखद वाटते. ...
चांगले मित्र
म्हणजे देवाने खास तुमच्या साठी पाठविलेला देवदूत असतो.... जो केवळ तुमची काळजी करत असतो, बदल्यात तुम्ही त्याची कितीही उपेक्षा केली तरी
तो तुमच्या वर रूष्ट होत नाही.
असा एखादा मित्र
असणे हेच मुळी आपले भाग्य असते.
११
चांगलं आयुष्य
जगण्यासाठी आपणास ब-याचदा काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. सोडाव्या लागणा-या सगळ्याच
गोष्टी काही वाईट नसतात. काही खूप छान असतात.
जीवनात काही
गोष्टीमध्ये आपण स्वतःला इतके गुंतवून घेतलेले असते, की आपण मोकळ्या मनाने वाटचाल करूच शकत नाही. ही गुंतवणूक आर्थिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, शारीरिक असेल
किंवा मानसिक असेल.
गुंतवणूकी खेरीज
माणूस जगू शकत नाही. पण काही गुंतवणूकी आपणास अक्षरशः गुंतवून टाकतात, पायातील
बेडी बनतात, गळ्यातील लोढणं बनतात. त्या लोढण्यासह
सामान्यता
आयुष्य जगत असताना काही वेळा आपली फरपट होत असते, अनेकदा आपण ठेचकाळुन पडतो, रक्तबंबाळ होतो, मंदगती बनतो आणि
अगतिक सुध्दा होतो. आपली कार्यक्षमता कमी होते, समाधान नाहीसे होते, चुका वाढू लागतात, आपल्या सहका-यांच्या दयेवर
आपण आला दिवस कसाबसा ढकलत असतो.
तेव्हा हिच वेळ
असते,
स्वतःत बदल
करण्याची,
सगळा कचरा डंप
करण्याची, आपले वर्तुळ लखलखीत करण्याची.
पहाटे किंवा
रात्री आपण जेव्हा अजून अंथरुणावर पडून काही नियोजन करत असतो तेव्हा अशा कोणत्या
गुंतवणूकी आपणास तोट्यात आणताहेत यावर थोडा विचार करून बघितलं तर आपल्या लक्षात
येइल. ब-याचदा काही
गुंतवणूकीतून आपण सहज बाहेर पडू शकतो, पण काही गुंतवणूकी ह्या अशा असतात की त्यातून
बाहेर पडणे सहजसाध्य होत नाही. या गुंतवणूकीना आपण आपले आयुष्य समजत असू तर ते
आनखीच कठीण होऊन जाते.
पण गॅन्गरिन
झालेल्या अवयवा सह जगत राहिलो तर जगणेच थांबेल, म्हणून आपण स्वतःला अवघड अशा शस्त्रक्रियेस तयार
करतो. आणि जन्मापासून साथ देत असलेला एक अवयव आपण
गमावतो. त्यानंतर आपण आपल्या जीवनात अपूर्णता अनुभवतो, पण फक्त थोडे
दिवसच. नंतर त्या अवयवहिनतेला सुध्दा आपण जमवून घेतो.
मित्र हो जगात
हजारो वेळा उलथापालथ झाल्या असतील, तरीही जग सुंदरच आहे. आपल्या जीवनात सुध्दा अशी एखादी उलथापालथ झाली
तरीही आपले जगणं सुंदरच राहील.
१२
सकाळी कामाच्या
निमित्ताने आपण नेहमी घराबाहेर पडतो. बाहेर पडताना आपणास ,'जपून जावा' असं कोणीतरी
म्हणतं.
जपून जावा
म्हणणारे निश्चित आपल्या वर प्रेम करत असतात, आपली काळजी त्याना वाटत असते आपली काळजी कोणीतरी करतंय ही भावनाच मुळी किती
सुखकर आहे ना.
पण ब-याचदा जपून या शब्दाचा आपण 'स्वतःला जपून' असा संकुचित
अर्थ घेतो. पण हा शब्द खूप व्यापक आहे. कदाचित असे म्हणणारे तुमचे आईवडील, पतिपत्नी, भाऊ बहिण, मित्र मैत्रिण असे कोणीही असू शकते. त्यांच्या जपून
चा अर्थ स्वतःला जपा, तुमच्या सोबत असणा-याना जपा, त्यांचा तुमच्या
वर असणा-या विश्वासास जपा, असा व्यापक असतो.
यातील सर्वात
शेवटचा अर्थ आपण कधी लक्षात घेतच नाही.
इथून पुढे मात्र आपण हा अर्थ सुध्दा लक्षात घेऊया. स्वतःला तर जपूयाच, त्याचबरोबर इतरांचा आपल्यावर असलेल्या विश्वासास सुध्दा आपण जपूया.
कारण. .
विश्वास संपादन
करण्यासाठी खूप वेळ जातो, पण तो गमविण्यासाठी एक क्षण सुध्दा पुरेसा ठरतो.
आणि असं म्हणतात, की विश्वास हा काचेच्या भांड्यासारखा असतो, एकदा त्याला तडा गेला की पुन्हा जोडता येत नाही.
आणि समजा
कोणत्या तरी सोल्यूशन ने तुम्ही ते चिकटवलं तरी त्याच्या वापर पुढे फक्त एक शोपीस
म्हणूनच होतो..
फक्त एक शोपीस. ...
....लोकांना दाखविण्यासाठी,
त्याची उपयोगीता
मात्र ते भांडे गमावून बसते.
चला तर मग जपून
जाऊया,
जपून राहूया.....
१३
चित्र कलेच्या
तासाला शिक्षिकेनं सगळ्यांना एकेक ड्राॅईंग पेपर दिला आणि कशाचेही चित्र काढा
म्हणून सांगितले.
एक मुलगी चित्र
काढण्यात दंग झाली होती.
"कशाचं चित्र काढतेस हे तू?" शिक्षिकेने विचारलं.
"देवाचं" ती मुलगी वरती न पहाताच म्हणाली.
"पण देव कसा असतो हे कुणालाच ठाऊक नाही" शिक्षिका म्हणाली,
"माझं चित्र पूर्ण झाले की कळेल सर्वांना, देव कसा असतो ते". मुलीनं उत्तर दिले.
हा एक छोटासा
प्रसंग, ह्या प्रसंगातील मुलगी हुशार असलीच पाहिजे, पण त्याहूनही ती
खूपच सकारात्मक असली पाहिजे, तिच्या ठिकाणी निश्चितच दुर्दम्य आत्मविश्वास
असला पाहिजे.
आपण जे करतोय ते
परफेक्टच असणार आहे, असे समजून जेव्हा आपण एखाद्या कामास सुरुवात
करतो तेव्हा निश्चितच ते काम परफेक्टच होते.
पण अनेकदा, हे आपणास जमेल का, आपण तोंडावर पडणार तर नाहीना, आपल्याला लोक हसणार तर नाहीत असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात गर्दी करतात आणि
मग ह्या सर्व शंकाकुशंकांच्या भाऊगर्दीत यश हाती लागतच नाही.
आपण जे काम
करणार आहोत त्यामध्ये आपण निश्चितच यशस्वी होणार आहोत ह्यावर आपला विश्वास असलाच
पाहिजे. जर आपणच आपल्या वर विश्वास नाही ठेवला तर ईतर कसे ठेवतील.
दुष्काळाची
चाहूल लागलेले ग्रामस्थ पावसासाठी देवाला साकडे घालायला जातात, गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या ह्या
मंदिराकडे इतर लोकांबरोबर जात असलेल्या एका मुलाच्या हातात छत्री असते. सोबतचा एकजण त्या मुलाला विचारतो, "अकाशात एकही ढग नाही, पाऊस येण्याचे कोणतेच चिन्ह नाही, तरीही तु छत्री
कशाला घेतलाइस"?
मुलगा म्हणतो "आपण सगळे आता पाऊस मागायला देवाकडे चाललोय, येते वेळी काय
मग भिजतच यायचं काय"?.
आकाशात ढगाचा
ठिपूसही नसताना पाऊस येणारच हा आशावाद बाळगणारा हा मुलगा आणि आपल्या चित्राद्वारे
सगळ्यांना देव कसा दिसतो ते दाखवू पहाणारी ती चिमुकली या दोघांचाही आत्मविश्वास
आदर्शवतच आहे.
कोणताही नवीन
व्यवसाय करताना, नवीन उपक्रम सुरू करताना असा आत्मविश्वास
आपणाठायी असलाच पाहिजे. मी यशस्वी होणारच असा आशावाद बाळगणारा यशस्वी
होण्याचीच शक्यता अधिक असते.
तुमचा कोणताही
प्रश्न असूद्या किंवा कोणतीही समस्या असुदे, तुम्ही त्यावर निश्चितच मात करू शकता, पण काहीही
सुरूवात करण्यापूर्वी तुम्ही स्वतःलाच सूचित करा, "मी यशस्वी होणारच", आणि मग पहा डोंगरासारखे प्रश्न चुटकीसरशी सुटतील.
बायबल मध्ये "तुमचा स्वतःवर मोहरी इतकाही जर विश्वास असेल, आणि त्या विश्वासाच्या जोरावर जर एखाद्या
पर्वतालाही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची आज्ञा केलात तर पर्वत सुध्दा तुमच्या
इच्छेनुसार दुसरीकडे जाईल.
पण तसा
आत्मविश्वास हवा.
आहे का असा
आत्मविश्वास तुमच्याकडे. .?
माझ्याकडे अगदी
चार पाच दिवसांपूर्वी असा आत्मविश्वास होता, पण मी कोणत्याही पर्वताला इकडून तिकडे जा म्हणून
सांगितले नाही. ....
१४
जर तुम्ही आनंदी
क्षणाची वाट पहात राहीलात तर तुम्ही कायमचे वाटच पहात रहाल.....
परंतु जर तुम्ही
स्वतःला आनंदी समजत असाल तर तुम्ही कायमचे आनंदीच रहाल.......
आपण आनंदी
बनायचंय किंवा दु:खी हे आपण स्वतःच ठरवत असतो...
आणि एकदा का
तुम्ही निर्णय घेतला की मग त्यात कोणीही बदल करू शकत नाही....
मी खूप आनंदात
आहे, आणि मला माहिती आहे तुम्ही सुध्दा मजेत अहात.... अहात ना..?
असेच मजेत रहा.....
१५
जर रात्र नसतीच
तर....?
दिवसभर केलेल्या
कष्टाला ऊतारा मिळाला नसता.
काल, आज, उद्या ह्या
संकल्पना निर्माण झाल्या नसत्या.
आणखी ब-याच गोष्टी झाल्या असत्या आणि काही झाल्याही
नसत्या.
म्हणजे रात्र ही
खूप उपयुक्त गोष्ट आहे, हे आपणास वेगळे सांगण्याची गरज नाही.
आपणांस
सक्तीच्या विश्रांती साठी रात्र आवश्यक आहे.
पटतंय ना?
मग अजून जागे का?
झोपा की आता. ...
रात्रीचे
साडेदहा वाजले की.
मी तर झोपतो
बुवा आता.
फक्त तुम्हाला
शुभरात्री म्हणण्यासाठी अजून जागा आहे.
झोपा तर मग...
१६
जीवनात नेहमी
अशा क्षणांची आठवण काढावी, ज्यामुळे डोळ्यात चमक येईल, चेह-यावर स्मित
निर्माण होईल,
ह्रदयात गुलाब
फुलतील, मन स्मृतीच्या हिंदोळ्यावर झुलू लागेल, आणि आयुष्य
सुंदर आहे याची खात्री पटेल.
अशा आठवणी असणे
हे आयुष्य समृद्ध असल्याचे लक्षण आहे.
काही जण मात्र
पदमनाभम मंदिरातील खजिन्यासारखं जीवनातील गोड आठवणींचा खजिना ह्रदयात गाडून टाकतात. ज्या ह्रदयात आठवणी गाडल्या जातात त्याला मंदिर
कसे म्हणता येईल? . उपमा द्यायचीच झाली तर त्याला स्मशानभूमी म्हणता
येईल.
THOUGHT OF THE DAY.
हृदयाला
स्मशानभूमी बनवू नका,
१७
जीवनातून
त्रासदायक माणसाला दूर केल्या बद्दल. ....
आपण स्वतःला कधी
अपराधी समजू नये. ........
एखादा आपला
नातेवाईक आहे,
आपला सहकारी आहे,
बालपणीचा मित्र
आहे
किंवा
नुकताच जवळ
आलेला एखादा मित्र आहे ...
म्हणून त्याच्या
कडे दूर्लक्ष करू नका. ...
जी माणसं
तुम्हाला दूःख देतात
किंवा तुम्हाला
कमी लेखतात अशांसाठी तुमच्या मनात अजिबात
जागा असता कामानये.
एखादा माणूस
तूमचा सतत अनादर करतोय. ..
मर्यादांचा सतत
भंग करतोय,
...
तुमच्या
भावनांशी खेळतोय.....
आणि तुम्हाला
फक्त त्रास आणि त्रासच देतोय. ....
त्याला तुम्ही
तुमच्या जीवनातून दूर केलंच पाहिजे.
१८
जे खूप मोठी
स्वप्न पहातात त्यांच्या साठी रात्र छोटी असते, तर स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जे धडपडत असतात
त्यांच्यासाठी दिवस छोटा असतो. स्वप्नं बघायलाच हवीत, तीच आपल्या साठी प्रेरक ठरतात. स्वप्न म्हणजे एक ध्येय असते, ते सतत आपणास
खुणावत राहिले पाहिजे तरच त्याचा ध्यास लागेल, आणि एकदा का ध्यास लागला की मग तुम्हाला दिवस
अपुरा पडतोच.
माणूस फक्त
झोपेतच स्वप्न पहातो असे नाही, जागेपणी सुध्दा तो अनेकदा स्वप्नात हरवून जातो. पण फक्त टाईमपास
म्हणून किंवा रंजन म्हणून स्वप्न पाहू नका. केक्युले
नावाच्या शास्त्रज्ञाला एका प्रश्नाचे उत्तर रात्री स्वप्नात मिळाले होते म्हणे, हेली गॅब्रसलाली नावाच्या एका गरीब कुटूंबात
जन्मलेल्या मुलाने लहानपणी एक स्वप्न पाहिले, त्या स्वप्नात त्याने स्वतःला ऑलिंपिक स्पर्धेत
पळताना पाहिले, आणि मग हे स्वप्नच त्याचे जीवन बनले. आपल्या आठ
भावंडासह हेली पहाटे पाच वाजता उठायचा आणि त्यांच्या घरापासून
दोन मैल अंतरावर डोंगरात असणा-या एकमात्र झ-याचे पाणी
आणायचा,
पाणी भरण्यासाठी
दररोज त्याला किमान चार खेपा माराव्या लागायच्या. आणि मग तो शाळेत जायचा, तो लहान असताना
त्याची आई वारली, वडिलांनी त्याला शेतात कामाला जुंपले मात्र प्रसंगी मार खाऊन हेली ने
आपले स्वप्न जपले आणि शेवटी जगातील सर्वात वेगवान माणूस म्हणून काही काळ आपली ओळख
निर्माण केली.
अरे हो मी
विसरलोच,
मी लिहायचं
थांबलो तरच तुम्ही वाचायचे थांबाल, वाचण थांबले तरच
झोपी जाल, आणि झोप लागली तरच स्वप्न पहाल,
आधी स्वप्न
बघितलं पाहिजे, स्वप्नपूर्तीचा भाग हा त्यानंतरचा.
१९
प्रत्येक दिवस
खूप काही चांगलं देऊन जावा अशी इच्छा असणं
काही वाईट नाही. पण प्रत्येक दिवस चांगला जावाच असा अट्टाहास
बाळगणं मात्र चुकीचे ठरू शकते. अनेक वेळा एखाद्या दिवशी काही अनपेक्षित व सुखद
धक्कादायक गोष्टी घडतात, तुम्ही त्या क्षणाच्या पहिल्याच स्पर्शाने
मोहरता,
मात्र तो क्षण
तुमच्या आयुष्यातील खूप मोठा आनंद हिरावून घेण्यासाठीच आलेला असतो. खूप जवळची माणसं पण अशी निष्ठूरपणे कशी वागू
शकतात हे मला आजपर्यंत न सुटलेले कोडे आहे.
असो, अशा धक्का देणा-यांकडून एकच
अपेक्षा करता येते, तुम्ही दिलेले धक्के सोसण्याची ताकद आहे ...मात्र धोका
सोसण्याची ताकद नाहीय माझ्या कडे. एक गोष्ट
अलिकडे व्हाटसअप वर खूपच दिसतेय. एका महिलेनं एक साप पाळलेला असतो, एकदा साप अस्वस्थ असल्याचे तिला जाणवते, ब-याच डॉक्टरना ती
साप दाखवते मात्र सापाच्या प्रकृतीत फरक होत नाही. शेवटी एका
नावाजलेल्या वैद्याकडे ती जाते. वैद्य विचारतो. रात्री साप कोठे
असतो,
महिला सांगते की साप रात्री सुध्दा तिच्या बेडवर
असतो.
त्यावेळी वैद्य
विचारतो साप रात्री आपले शरीर सरळ लांब करून पडतो का. महिला म्हणते
होय, त्या वेळी वैद्य म्हणतो ... सापाच्या डोक्यात तुम्हाला खाण्याची ईच्छा आहे. ज्या वेळी तो स्वतःला तुमच्या शरीरा पेक्षा मोठा
समजेल तेव्हा तो तुम्हाला गिळून टाकेल.
अर्थात ही गोष्ट
खोटी आहे असे समजून सुध्दा बरेच काही ही गोष्ट शिकवून जाते.
आपण आपल्या
जीवनातील एक हिस्सा म्हणून ज्यांना समजतो तेच गिळून टाकण्यासाठी टपून बसलेले असतात.
हे जेव्हा समजते
तेव्हा वाईट वाटून घेण्याखेरीज तुम्ही काहीच करू
शकत नाही. ....
तात्पर्य :
जीवनात माणसं
जोडताना जरूर विचार करावा, पण एकदा नाते जुळले की मग कसलाही विचार न करता
ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.
२०
प्रत्येकाला
वाटते की आपण कधी चुकतच नाही. पण कधी कधी असे म्हणणारेही चुकू शकतात, अर्थात माणूस म्हंटला की चुकणारच, पण कधी कधी माणसाला आपलं काय चुकलं हेच कळत नाही. बिचारा.... ,
अशा वेळी त्याच्या इतकी वाईट अवस्था कोणाचीच
नसते.
समोरच्याचा राग
त्याच्यावर असतो, त्यालाही तो राग कळत असतो पण त्यामागील कारण
मात्र त्याला समजू शकत नाही.
हे वर्ष आपणा
सर्वांच्या मुळे माझ्यासाठी तसे खासच ठरले. अर्थात आयुष्यात सुख आणि दुख हे दोन्ही येतातच, भरपूर सूख
असतानाही माणसाला थोडंसं दूख देखील पेलवेणासे होते कधी कधी. अशा वेळी खास
माणसं जर जवळ असतील तर कोणतेही दूख पेलण्याची ताकद माणसात येते. माझ्यासाठी आपण
सर्व तसे खासच आहात, माझ्या जीवनात नेहमीच मी तुमच्या अस्तित्वाला
अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले दोन शब्द
माझ्यासाठी नेहमीच धिर देणारे ठरतात.
ह्या वर्ष भरात
मी आपणा सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न केला, तरीही कधी अनवधानाने माझ्या कडून आपण दुखावले
गेला असाल तर मी आपली माफी
मागतो,
आपण मला माफ
करावे.
ह्या वर्ष भरात
मी आपणा सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही कधीतरी अनवधानाने माझ्या तोंडून कटूशब्द
बाहेर पडले असण्याची शक्यता आहे. या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो, आपण मला माफ
करावे.
ह्या वर्ष भरात
मी आपणा सर्वांशी नित्य नेहमी संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही प्रसंगी मी तुमच्याशी संपर्क साधू
शकलो नसेल तर ती माझीच चुक झाली असणार. याबद्दलही मी
आपली माफी मागतो, आपण मला माफ करावे.
ह्या वर्ष भरात
मी माझ्या मित्र परिवाराच्या सुख दुखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहेच. चुकून कधी मी आपल्या कोणत्या कार्यक्रमात सहभागी
होवू शकलो नसेल तर ती माझी चुकच आहे. त्याबद्दलही मी
आपली माफी मागतो, आपण मला माफ करावे.
मैत्रीत कधीही Sorry आणि Thankyou या
शब्दाना थारा नसतो, तरीही त्याच्या अभावी नात्यात कटूता निर्माण होवू नये यासाठी मी आज या क्षणी जर माझे काही
चुकले असेल तर, आपणा सर्वांची माफी मागतो, आणि आपण सर्वानी
माझ्या आयुष्यात जे सुखद क्षण पेरलेत त्याबद्दल मी आपणा सर्वाना धन्यवाद देतो.
मागील वर्षात माझ्याविषयी तुमच्या मनात जी चांगली
भावना आहे ती एका बॅगेत भरा आणि 2016 मध्येही ही बॅग नित्य आपण आपल्या सोबत बाळगा. गेल्यावर्षा मध्ये माझ्याकडून ज्या चुका झाल्या असतील त्या
मुळे माझ्याविषयी तुमच्या मनात थोडा अधिक राग असेल तर त्याचेही एक गाठोडे बांधा, हे गाठोडे याच वर्षात अगदी खोल पुरुन टाका, या नवीन वर्षा मध्ये आपल्या मनात माझ्याविषयी अजिबात राग
नसावा ही अपेक्षा यानिमित्ताने मी करतो.
आपण चांगले आहात, तुमच्या संगतीत मी राहिलो तर मी सुध्दा चांगला
होईन, माझ्यातील अवगूण कमी करण्याचा हा एक चांगला उपाय
आहे. सबब चांगला बनण्यासाठी आपण मला मदत करावी. या
वर्षाप्रमाणेच पुढील वर्षी सुध्दा आपण माझ्याशी आपला माणूस बनून वागावे ही अपेक्षा.
२१
माणसाचा चेहरा
कधी खोटं बोलत नाही. हिंदी मधील कोणत्यातरी सिनेमा मध्ये तशा आशयाचे
एक गाणं देखील आहे, "दिल की बात बता देता है असली नकली चेहरा". वरवर पाहिले तर हे वाक्य खरं वाटते पण काही लोक
असे असतात की, मनात काय आहे हे कधीच त्यांचे चेहरे सांगत नाहीत. दुःखात
सुध्दा हसणारी माणसं अनेक असतात, आणि सर्व काही चांगलं असताना सुध्दा मयताहून
आल्या सारखा चेहरा करून बसलेली माणसं पण समाजात पहायला मिळतात.
अंतरीचे दुःख
चेह-यावर दिसू न देणा-याना चांगलंच
म्हंटलं पाहिजे. पण कधीतरी मन मोकळं करणे सुध्दा गरजेचे असते. पण त्या साठी तशी एखादी जागा असावी लागते. जिथे मन मोकळे करावे असे वाटावे अशी एखादी जागा
असणे, ज्या खांद्यावर विश्वासाने डोके ठेऊन डोळ्यांतील
अश्रूंना मोकळे करता येईल असा एखादा खांदा असणे खूप भाग्याचे असते. असा एक खांदा
असावा.
माझ्या
मतानुसार आयुष्याच्या अंतिम क्षणी लागणा-या चार खांद्याची काळजी करतो, तशी चार माणसं
जोडतो देखील, पण विश्वासाने ज्या खांद्यावर डोके ठेऊन
डोळ्यांतील अश्रूंना मोकळे करता येईल असा एखादा खांदा मात्र त्याला मिळत नाही. अनेकांना असा खांदा मिळतो, पण तो जपता येत
नाही, ते फक्त गर्दी जमवण्याच्या मागे लागतात.
कोठे तरी मी
वाचलंय,
तुम्ही दुःखी
असताना तुम्हाला एखादा मित्र "कसा आहेस" म्हणून विचारतो, तुम्ही हसत हसत
म्हणता ठिक आहे. तरीही तो तुमच्या मनातील दुःख ओळखून तुमच्या
खांद्यावर हात ठेवतो, आणि थेट डोळ्यात पाहून विचारतो " मला नाही सांगणार तर मग कुणाला सांगणार, खरं सांग काय दुःख आहे". असा एखादा मित्र असणे हे श्रीमंतीचं चिन्ह आहे.
माझं काय सांगू? पण आहे का असा एखादा मित्र तुम्हाला तरी.
२२
मार्च : थोडा घाई गडबडीचा महिना. नोकरदारांसाठी
आर्थिक वर्षाखेर, प्रत्येकाला आपले उद्दिष्ट रात्रंदिन डोळ्यासमोर
दिसत असते. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा सिझन, कितीही अभ्यास
केला तरीही परीक्षा पूर्ण होइतोपर्यंत मनावर मणामणाचं ओझं असतंच. उपवरांसाठी हा काळ जसा स्वप्न रंगवण्याचा असतो
तसाच तो भविष्याविषयक काळजीचा सुध्दा असतो, कार्य पूर्ण
होईपर्यंत एक अनामिक हूरहुर यांना अस्वस्थ करीत असतेच. तमाम महिलावर्गासाठी हा सिझन पुढील वर्षभराच्या
नियोजनाचा असतो, सांडगे पापड यासाठीची तयारी तर असतेच शिवाय चटणी
तयार करणे,
या दिवसातच येणा-या यात्रेची
तयारी, लग्न समारंभ, वास्तुशांती आणि इतर पैसा पाहुण्यांच्या
यात्रेला उपस्थिती अशी यांची कामे वाढतंच असतात. प्रत्येकजण गडबडीत असतो मार्च महिन्यात.
माझ्या सारखी
काही माणसं मात्र अगदी मजेत असतात. खरोखर जगत असतात, त्यांची नजर असते आसपासच्या झाडांना फुटलेल्या
पालवीवर. नाजूक, कोवळी, पिवळी, तजेलदार, लुसलुशीत पानं
नवी उमेद देतात. अशा निसर्गवेड्यांची नजर असते आम्र वक्षावर, आम्रवृक्षांचा
मोहर पाहून ते स्वतः मोहरतात, मोहरातच त्याना उद्याचा पिवळा धमक रसरशीत, मोहक, ज्याचा केवळ
स्पर्श सुध्दा मनावर गारूड घालतो असा पिकलेला आंबा दिसत असतो ( आशावाद आशावाद
म्हणजे दुसरे काय ). अशा लोकांची नजर असते रानमेव्याकडे, कोणत्याही
पेस्टीसाईडस् चा वापर न करता निसर्गाच्या कृपेने, निसर्गाच्या कुशीत वाढलेल्या अनेक वेली करवंदाचा
नजराणा पेश करण्यास कधी सिद्ध होतात याचीच हे लोक वाट पहात असतात. रसना तृप्त
करणारे रसाळ आंबे कितीही खाल्ले तरी हाव कमी होत नाही अशांची, आणखी थोडे
उद्यासाठी म्हणून पिशवी भरतेच, कारण याना माहिती असते हा सिझन पुन्हा एका वर्षाने येणार असतो. लालभडक फुलाने फुललेल्या सावरी, नुकताच कोठेतरी
फुललेला बहावा...... निसर्गाच्या प्रेमात पडण्यासाठी या वेड्यांना
फक्त एक बहाणा हवा असतो, आणी मार्च महिन्यात हा बहाणा याना मिळतो सुध्दा.
मग व्हाल
माझ्यासारखे निसर्गवेडे.
खरं सांगतोय.....
लक्षात ठेवा. .....
जेव्हा तुम्ही
निसर्गवेडे व्हाल ना,
तेव्हाच तुम्ही
स्वतःला शहाणे सिध्द कराल.......
२३
अमेरिकेतील
कॅलिफोर्निया प्रांतात आल्प्स पर्वतराजी आहे, ह्यातील माऊंट व्हिटनी नावाच्या शिखरावर
जाण्यासाठी गिर्यारोहकांची वर्दळ पहावयाला मिळते, ह्या शिखरावर जाण्यासाठीच्या मार्गावर एका फत्तरावर कोण्या एका गिर्यारोहकानेच
लिहिले आहे म्हणे "Getting to the top is optional, Getting down is mandatory. (अर्थ : शिखरावर पोचणं
ऐच्छिक, खाली येणं (सुरक्षित) अनिवार्य.) खूप छान लेख आहे. वरील वाक्य मात्र माझ्या मनात रूतुनच बसले.
कोणत्याही
गोष्टीला वरील वाक्य लागू पडते.
महाभारताच्या
युद्धात कौरवानी रचलेला चक्रव्युह भेदने अभिमन्यूला शक्य झाले मात्र त्यातून
सुरक्षित बाहेर त्याला येता नाही आले.
माणूस अनेकदा
स्वतः रचलेल्या चक्रव्युहात अडकून पडतो, त्यातून बाहेर पडणे अनेक कारणानी त्याला शक्य नाही होत. अनेक जण ह्या चक्रव्युहालाच आपले जग समजतात, तर काही बाहेर
पडण्याच्या प्रयत्नात जग सोडून जातात.
कित्येकदा
माणसाला आपण चक्रव्युहात अडकत चाललोय हेच मुळी समजत नाही, प्रत्येक वेळी
(अगदी किरकोळ अपवाद वगळता) माणूस स्वतःच्या
इच्छेने चक्रव्युहात अडकतो.
संसार, नोकरी, प्रेम, व्यापार, राजकारण, करिअर अशा वेगवेगळ्या नावाने सध्या हे चक्रव्युह ओळखले जातात. ह्या सगळ्याच पर्वत शिखरावर जाताना
"Getting to the top is optional, Getting down is mandatory. हे लक्षात ठेवायला हवंच... किमान इथून पुढे तरी ?
ठेवाल ना लक्षात,
ठेवायलाच हवं...
२४
गुढीपाडवा साजरा
करावा की नको? यासंदर्भात
सध्या काही व्हाटसअप ग्रुपमध्ये बरीच चर्चा झडली. या चर्चेत
सहभागी व्हावे असा विचार अनेकदा माझ्याही मनात आला. काही ओळी मजकूर टाईप सुध्दा केला. पण अखेरीस मी
मनातील विचार आणि मोबाईल मधील
मजकूर डिलिट केला आणि शांत राहिलो.
माझे प्रामाणिक
मत विचाराल तर मी म्हणेन की धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. यासंदर्भात उठसूट जर प्रत्येकजण स्वतःला इतिहास
संशोधक समजून नवीन संदर्भ जोडू लागले तर हिंदू धर्माचे काय होईल या पेक्षा सुध्दा
या देशाच्या एकता आणि अखंडतेचे काय होईल हा प्रश्न मला भेडसावतो आहे.
एक अँड्राईड
मोबाईल आणि एक व्हाटसअप अकौंट या एवढ्या सामग्रीच्या आधारावर आज प्रत्येकजण
सल्लागार, संशोधक, समुपदेशक, तत्वज्ञानी,.....
आणि बरेच काही समजू लागला आहे. काही तरी सेंड केलेच पाहिजे, आपण ग्रुपमध्ये
सक्रिय असले पाहिजे, काही तरी सनसनाटी आपणही फाॅरवर्ड केले पाहिजे ह्या विचाराने
अनेकदा,
अनेकजण, अनेक ग्रुपमध्ये
झपाटून मेसेज फाॅरवर्ड करत असतात.
देश सध्या कधी
नव्हे इतका संवेदनशील बनला आहे, साधी साधी आंदोलने हिंसक बनताहेत (बनवली जाताहेत.... असे म्हंटलं तर ते अधिक योग्य होईल) माध्यमातून होणा-या चर्चा या
आगीत तेल ओतण्याचे काम करताहेत. ... केवळ आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी नवनवीन
विषय निर्माण केले जात आहेत. आणि नको त्या दिशेला समाज ओढला जातो आहे.
देशाचे
पंतप्रधान नेहमी विकासाचा जप करत असताना सर्व सामान्यांना देवा धर्मातील विवादात
गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न काही करू पहाताहेत. किरकोळ गोष्टी साठी काही जण समाजाला, सरकारला, न्यायालयाला
वेठीस धरताहेत. आणि टिव्ही चॅनेल वाले अशा लोकांना आणि
त्यांच्या कारवायाना ब्रेकींग न्यूज बनवताहेत. थोड्या
प्रयत्नाने मिळणारी प्रसिद्धी अशा माणसांना सुखावून जाते, आणि माणसांचं रक्त जिभेला लागलेल्या नरभक्षक
वाघासारखे मग हे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते सुसाट सुटतात, नित्य नवा विषय ( साॅरी विवाद ) उकरून काढायचा
आणि नित्य प्रसिद्धी च्या झोतात रहायचे हेच अशांचे जीवन ध्येय बनते. पण यामुळे समाज दुभंगतो, समाजाची आणि
देशाचीसुध्दा शांतता भंग
पावते, आणि अशांत देश विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ शकत
नाही.
मी हे सर्व
एवढ्या साठी आज लिहीतोय, की तुम्ही अशा विघातक गोष्टी मध्ये सहभागी नसताय
याची मला खात्री आहे आणि माहिती सुध्दा
आहे, पण म्हणून तुमची जबाबदारी पार पडली असे तुम्ही
समजू नका, जेंव्हा जेंव्हा शक्य आहे आणि जिथे जिथे शक्य
आहे तेव्हा आणि तिथे आता तुम्ही समाजातील
सौहार्दाचे,
भाईचा-याचे वातावरण
कसे टिकून राहिल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नवीन वर्षात
तुमच्या अशा काही प्रयत्नामुळे समुद्रातील पाण्याच्या एका थेंबाइतकाजरी समाजात बदल झाला तरी आयुष्य सार्थकी लागले असे म्हणता
येईल.
लक्षात ठेवा
सज्जनांची निष्क्रियता हि दुर्जनांचे बल वाढवते.
२५
स्वप्नांच्या
संदर्भात आणखी थोडंसं : एकदा एका लहान मुलाला त्याच्या वडिलाच्या
मित्राने विचारले "बाळ मोठेपणी तुला काय बनायचंय"?. मुलगा जो दररोज टांग्यात बसून
शाळेत जायचा, जाता येता रंगित कपडे घातलेल्या टांगेवाल्याला
पहायचा, हातातला चाबूक उगारून तो घोडा पळवायचा, त्या मुलाला तो
टांगा आणि टांगेवाला आवडायचा. त्याने पटकन उत्तर दिले "मोठा बनवल्यावर मी टांगेवाला होणार". उत्तर ऐकून मुलाच्या वडीलांचा मित्र शांत बसला मात्र वडीलांचे
पित्त खवळले, त्याना तची अपमान वाटला. त्यानी मुलाला
चोप चोप चोपला. मुलगा रडू लागला, आवाज ऐकून आई
धावत आली.
चिडलेल्या
वडिलांनी तिला सगळा प्रकार सांगितला. आईने मुलाला जवळ
घेतले मायेने पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली "बाळ तुला टांगेवाला बनायचंय ना?, बाळाने रडतच होकारार्थी मान हलवली. आईने मुलाला
देवघरात नेले. तीथे देव्हा-यात ठेवलेला एक
फोटो दाखवून आईने म्हणाली "टांगेवाला बनायचंय ना, तर मग हा फोटो
मध्ये आहे ना तसाच टांगेवाला बन. तो फोटो होता रथात बसलेल्या अर्जुनाचे व त्याचे
सारथ्य करणा-या श्री कृष्णाचे.
मुले लहानपणी
कसलेही ध्येय उराशी बाळगतात पण आई वडिलांनी त्याला योग्य वळण दिले पाहिजे. योग्य वेळी योग्य आदर्श मुलांसमोर ठेवण्याचे काम
पालकांनी केले पाहिजे.
२६
तुम्ही खूप चांगले अहात, हुशार अहात, दूरदृष्टी असणारे अहात, प्रयत्नवादी अहात.
तुमचं बोलणे
मधुर आहे, कधी काय बोलावे या पेक्षा काय बोलू नये हे तूम्ही चांगलं जाणता. विशेष म्हणजे
तुमच्या कर्तृत्वाला चांगला वाव आहे. तुम्ही मनात आणलं तर खुप काही करू शकता, गरज आहे ती फक्त
सुरुवात करण्याची.
ईच्छा आणि
सिध्दी यामध्ये फक्त प्रयत्नांचे अंतर असते. मात्र हे अंतर काटण्यासाठी माणसाला रक्ताचं पाणी
करावं लागतं.
यश कधी कोणाला
डाउनलोड करून घेता येत नाही, ते निर्माण करावे लागते. पोहायला शिकण्यासाठी स्वतःच पाण्यात उतरावे
लागते. एक दोनदा पाण्यात जीव घुटमळेल, नाका, तोंडात पाणी
जाईल,
आता सारं संपलं
असे सुध्दा वाटतं, पण अशा वेळी सुध्दा जो हात पाय हलवत असतो तोच
पोहायला शिकतो. कोणतीही नवीन गोष्ट सहजासहजी साध्य होत नाही. अनेकदा यश हाती येतंय असे वाटत असतानाच पुन्हा
ते दूर जाते.
पण प्रयत्न
सोडून चालत नाही. हार मानून चालत नाही, आपण संपलो म्हणून थांबून यश मिळत नाही, ज्यावेळी असे वाटते ना तेव्हा डोळे बंद करा, एक दिर्घ श्वास घ्या आणि माझा चेहरा समोर आणा. (गम्मत नाही करत, शेकडो लोकांना
ह्याचा लाभ झाला आहे, It's
working.)
तुमच्या चेह-यावर हसू उमटेल, (मला पाहून अनेक जण हसतात हे सत्य आहे, अर्थात मी कधी कारण नाही विचारत, झाकली मुठ.... ) मग थोडं शांत बसा. आणि मग मनातल्या सगळ्या नकारात्मक विचारांना पळवून लावा, मी यशस्वी होणारच हे स्वतःला खात्री पूर्वक
पटवून द्या. आणि उठा, आणि लागा कामाला.
शेवटी यशाचे एक
सिक्रेट सांगतो... पहाटे जाग आल्यावर (हो सांगायचे
राहूनच गेलं तुम्ही अंघोळ आटोपून दररोज सूर्योदय होताना बघा.... यामुळे खूप काही नाही घडले तरी लवकर
उठण्याची सवय तरी लागेल)
ठिक आहे तर
पहाटे जाग आल्यावर किंवा जेव्हा एखाद्या मंदिरात जाल तेव्हा आवर्जून देवाला तुमची
ईच्छा सांगा (मी नेहमी देवाकडे सगळे मागतो, जोपर्यंत मी
यशस्वी होत नाही, जे पाहिजे ते हाती लागत नाही तोपर्यंत मी देवा कडे मागतच रहातो) आता तुम्हाला वाटेल ही तर अंधश्रद्धा आहे. पण त्या मागे माझे स्वतःचे एक शास्त्र आहे. तुम्ही दिवसभरात किमान पाचसहा वेळ तरी
मंदिरासमोरून जाता, प्रत्येक वेळी तुम्हाला हात जोडून थांबून
नमस्कार करणे शक्य नसले तरीही जाताजाता मनोमन तुम्ही नमस्कार करताच, फक्त त्यावेळी
जाणीव पूर्वक तुमची ईच्छा, ध्येय, स्वप्न व्यक्त करा. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण आपले स्वप्न कधी विसरत नाही, नेहमी त्याचे स्मरण रहाते, आणि जेव्हा एखादा विचार सतत मनात घोळत रहातो तेव्हा कृती घडते, नवनवीन मार्ग सुचतात आणि मग आपण आपल्या ध्येय मार्गावर पुढे जातो (It works). पहा तरी एकदा खात्री करून,
अहो यश तुमचंच आहे, आणि भिता कशाला. ..."मै हूँ ना".
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा